काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगोला येथे रविवारी झालेल्या कार्यक्रमात ‘काय झाडी काय डोंगरवाले, आपण गद्दार नाही’ अशी टीका आमदार शहाजी पाटील यांच्यावर केली होती. त्याला आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज सांगोल्यातील एका कार्यक्रमानंतर उत्तर दिले. ‘काँग्रेस पक्षाने ज्याला काहीच कळत नाही, असा कमी बुद्धीचा प्रदेशाध्यक्ष केला,’ अशी बोचरी टीका पाटील यांनी नाना पटोले यांच्यावर केली.
ज्याला खालचे वरचे कळत नाही, त्याला काँग्रेसने कारभारकी दिली आहे. नाना पटोले हे राजकारणातले अतिशय कमी बुद्धी असलेले व्यक्तिमत्व असून, दुर्दैवाने ते सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत, अशी बोचरी टीका आमदार शहाजीबापू पाटील यांनी केली. ते सांगोला येथे बोलत होते. सांगोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि आमदार शहाजीबापू पाटील एकाच कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी शहाजीबापूंनी शरद पवारांवर स्तुतिसुमने उधळली. मात्र, माध्यमांशी बोलताना नाना पटोले यानांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.
शहाजीबापू म्हणाले की, सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या द्वेषापोटी अनेक जण त्यांना विरोध करताना दिसत आहेत. काँग्रेस पक्षाने तर राजकारणात ज्याला काहीच कळत नाही, असा कमी बुद्धीचा प्रदेशाध्यक्ष निवडला आहे. हे प्रदेशाध्यक्ष दररोज काहीही बोलत सुटले आहेत. त्या नाना पटोलेले कोळं कुठं, करगनी कुठं, नाराळ कुठं, अकलूज कुठं काय माहित हाय का? काँग्रेसमध्ये अध्यक्षपद द्यायला कोणी माणूस नाही, म्हणून याला काढलाय. राजकारणातले अतिशय कमी बुद्धी असलेले व्यक्तिमत्व दुर्दैवाने सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेत, असा टोलाही लगावला आहे.