भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात भारतीय दंड विधान संहिता ३७६ (२) अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.
गणेश नाईक यांच्याविरोधात याआधीच मानसिक छळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून बेलापूर नंतर आता नेरुळ पोलीस ठाण्यातही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर २७ वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा दावा करणाऱ्या महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी, आता गणेश नाईक यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. नाईक यांच्यासोबत २७ वर्ष लिव्ह इनमध्ये राहून त्यांच्याकडून मला एक मुलगा आहे, परंतु ते त्याचा स्वीकार करण्यास नकार देत असल्यामुळे संबंधित महिलेने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर नाईकांवर कारवाई न झाल्यामुळे पीडित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे धाव घेतली. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या निर्देशानंतर पोलिसांनी गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्काराच गुन्हा दाखल केला आहे.