Mobile Recharge Plans महागणार? TRAI कडून ‘नेटवर्क स्लाइसिंग’चा नवीन मसुदा जारी; आता 4G आणि 5G च्या किमती असणार वेगळ्या

नव्या 'नेटवर्क स्लाइसिंग' (Network Slicing) तंत्रज्ञानामुळे टेलिकॉम कंपन्यांना युजर्सच्या गरजेनुसार आणि नेटवर्क गुणवत्तेनुसार वेगवेगळे दर आकारण्याची परवानगी मिळू शकते.

Mobile Recharge Plans महागणार? TRAI कडून ‘नेटवर्क स्लाइसिंग’चा नवीन मसुदा जारी;  आता 4G आणि 5G च्या किमती असणार वेगळ्या

4G vs 5G Tariff Plans Price Difference India: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) सेवा गुणवत्तेच्या (QoS) नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी एक महत्त्वाचा मसुदा सादर केला आहे. या नवीन प्रस्तावामुळे आगामी काळात 4G आणि 5G चे रिचार्ज प्लॅन्स पूर्णपणे वेगळे होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत ग्राहक 4G आणि 5G दोन्ही सेवांसाठी समान दराचे प्लॅन्स वापरत होते, परंतु नव्या 'नेटवर्क स्लाइसिंग' (Network Slicing) तंत्रज्ञानामुळे टेलिकॉम कंपन्यांना युजर्सच्या गरजेनुसार आणि नेटवर्क गुणवत्तेनुसार वेगवेगळे दर आकारण्याची परवानगी मिळू शकते.

काय आहे हे 'नेटवर्क स्लाइसिंग' तंत्रज्ञान?
'नेटवर्क स्लाइसिंग' ही 5G ची अशी एक अत्याधुनिक क्षमता आहे, ज्याद्वारे एकाच मुख्य नेटवर्कचे विविध व्हर्च्युअल स्लाईसेस (Slices) तयार केले जातात. या मॉडेलला महामार्गावरील वेगवेगळ्या लेनचे उदाहरण देऊन समजून घेता येईल:  
लेन 1 (सामान्य वापर): रोजचे सोशल मीडिया, बेसिक वेब ब्राऊझिंग आणि कॉलिंगसाठी.
लेन 2 (इमर्जन्सी सेवा): हॉस्पिटल्स आणि तातडीच्या आरोग्यविषयक डिजिटल सेवांसाठी.
लेन 3 (औद्योगिक वापर): रोबोटिक्स, स्मार्ट फॅक्टरीज आणि ऑटोमेशन उद्योगांसाठी.
लेन 4 (हाय-स्पीड व्हर्च्युअल लेन): रिअल-टाईम गेमिंग, ऑटोमन वाहने आणि अत्यंत उच्च गती लागणाऱ्या सेवांसाठी.

रिचार्जचे दर सरकार ठरवते की टेलिकॉम कंपन्या?
सामान्यतः ग्राहकांचा असा समज असतो की ट्राय (TRAI) किंवा केंद्र सरकार टेलिकॉम प्लॅन्सचे दर निश्चित करते. परंतु, प्रत्यक्षात जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्होडाफोन आयडिया (Vi) यांसारख्या कंपन्या स्पेक्ट्रम लिलावाचा खर्च, पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आणि बाजारातील स्पर्धा लक्षात घेऊन स्वतःचे दर निश्चित करतात. TRAI चे मुख्य कार्य हे ग्राहकांच्या हिताचे रक्षण करणे, कंपन्या पारदर्शक रीतीने काम करत आहेत की नाही हे तपासणे आणि निकोप स्पर्धेला प्रोत्साहन देणे हे असते.

हेही वाचा – Deepfake Regulations : डीपफेक आणि बनावट मजकुराला बसणार आळा; 'मेटा'ला सरकारचा इशारा; 2 ते 3 तासांत कारवाई करण्याचे निर्देश

ग्राहकांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार?
ज्या वापरकर्त्यांना अतिशय उच्च गती (High-Speed), शून्य लेटन्सी आणि अखंडित नेटवर्क आवश्यक आहे, त्यांना प्रीमियम दर देऊन स्वतःची 'व्हर्च्युअल लेन' खरेदी करावी लागेल. केवळ मेसेजिंग आणि बेसिक इंटरनेट वापरणाऱ्या सामान्य युजर्ससाठी परवडणारे बजेट प्लॅन्स उपलब्ध राहतील, मात्र 5G चा अमर्याद आणि हाय-स्पीड डेटा वापरणाऱ्या ग्राहकांना खिशाला जास्त कात्री लावावी लागू शकते. विशेषतः ऑटोमेशन, क्लाउड कॉम्प्युटिंग, एआय (AI) आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्यांना या स्लाइसिंग मॉडेलचा सर्वाधिक व्यावसायिक फायदा होणार आहे.

जगातही या पद्धतीचा वापर आणि भारतातील पुढील वाटचाल
दक्षिण कोरिया, जपान, अमेरिका आणि युरोपमध्ये स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग व ट्रान्सपोर्ट सेक्टरसाठी 5G स्लाइसिंगचा वापर आधीपासूनच यशस्वीरीत्या सुरू आहे. भारतात सध्या एअरटेल आणि जिओ 5G सेवांचा विस्तार वेगाने करत आहेत. TRAI चा हा मसुदा सध्या भागधारकांच्या हरकती आणि सूचनांसाठी खुला असून, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच अंतिम धोरण लागू होईल. मात्र, भविष्यात मोबाईल रिचार्जचे बिल केवळ डेटाच्या प्रमाणावर नव्हे, तर मिळणाऱ्या नेटवर्कच्या गुणवत्तेवर ठरणार हे आता स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – Arvind Kejriwal: ‘पंतप्रधानांसमोर इतके झुकू नका’ अरविंद केजरीवालांचा मेटावर गंभीर आरोप; नेमकं प्रकरण काय?

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number