नवी दिल्ली : महिलांविरुद्ध कथित आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी, राष्ट्रीय महिला आयोगाने सोमवारी स्टँड-अप कॉमेडियन्स प्रणित मोरे आणि मधुर विरली, तसेच '370 रुपयांची बिर्याणी' अशी टिप्पणी करणारा प्रेक्षक हिमांशू जांगरा यांची बाजू ऐकून घेतली. तसेच त्यांची माफी फेटाळून लावली, अशी माहिती सूत्रांनी दिली. आयोगाने या प्रकरणाच्या सुनावणीची पुढील तारीख निश्चित केली आहे, असेही त्यांनी सांगितले. "सुनावणीदरम्यान तिघांनीही माफी मागितली, परंतु आयोगाने ती माफी स्वीकारली नाही," असे एका सूत्राने सांगितले. या कार्यवाहीदरम्यान, आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी विनोदाच्या नावाखाली अशा प्रकारचा अवमानकारक मजकूर प्रसारित केला जाण्याबाबत आणि त्याला सामान्य मानले जाण्याबाबत तीव्र दुःख व चिंता व्यक्त केली.
आयोगाचा सर्जनशील स्वातंत्र्याला पाठिंबा असला तरी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ महिलांच्या शारीरिक स्वायत्ततेच्या उल्लंघनाचे समर्थन करणे किंवा बलात्कार व हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यांचे मनोरंजनासाठी साधन म्हणून वापर करणे असा होत नाही, असे आयोगाने ठामपणे पुन्हा एकदा स्पष्ट केले. महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवणारी विधाने केल्याच्या आरोपावरून, राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW) मोरे आणि जांगरा यांना आयोगासमोर हजर राहण्याचे समन्स बजावले. याव्यतिरिक्त, एका 'स्टँड-अप' कार्यक्रमादरम्यान महिलांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याप्रकरणी आयोगाने विरली यालाही एका वेगळ्या प्रकरणात समन्स बजावले.
हा वाद प्रणित मोरेच्या एका 'क्राउड-वर्क'दरम्यान सुरू झाला. यात जांगरा याने एका महिलेला 'डेट'वर नेल्याचा आणि तिच्यासाठी चिकन बिर्याणीवर 370 रुपये खर्च केल्याचा किस्सा सांगितला. त्याने सांगितले की, जेव्हा त्या महिलेने त्याला तिला घरी सोडण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याबदल्यात शारीरिक जवळीक साधण्याची अपेक्षा केली. हे ऐकून मोरे हसू लागला. त्यांच्या या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आणि त्यातील विधानांमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ही विधाने स्त्रीद्वेषी आणि संमतीशिवाय केल्या जाणाऱ्या वर्तनाला प्रोत्साहन देणारी मानली गेली. त्यानंतर, मोरे आणि जांगरा या दोघांनीही माफी मागितली. तसेच आपली इन्स्टाग्राम खाती बंद (डीअॅक्टिव्हेट) केली. गुरुग्राममधील एका कंपनीनेही जांगरा यांना त्यांच्या टिप्पणीवरून कामावरून काढून देखील टाकले.