नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर, उत्तराखंड आणि नागालँडमध्ये सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, अचानक पूर येणे आणि रस्ते अपघात यांसारख्या घटनांमध्ये किमान 22 जणांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या आठवड्यात वायव्य भारतात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला असून, ईशान्य आणि वायव्य भारतात आठवड्याच्या अखेरीस 'सक्रिय मान्सून'ची स्थिती राहण्याची शक्यता आहे. असे असतानाही, सलग दुसऱ्या दिवशी पावसाशी संबंधित घटनांमध्ये जीवितहानी झाली. "मान्सूनचा पट्टा (ट्रफ) दक्षिणेकडे सरकून आपल्या नेहमीच्या स्थितीकडे आला आहे. यामुळे आणि सक्रिय हवामान प्रणालींमुळे वायव्य व ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण वाढेल," असे हवामान विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
सोमवारी विविध राज्यांपैकी जम्मू-काश्मीरला सर्वाधिक फटका बसला. जिथे पावसाशी संबंधित ताज्या घटनांमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछ जिल्ह्यातील लोराणच्या वरच्या भागात मुसळधार पावसामुळे दरड कोसळली असून मातीचे घर कोसळल्याने त्याखाली दबून सात जणांचा मृत्यू झाला आहे. लोरान पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी (SHO) आणि निरीक्षक मोहम्मद युनूस खान यांनी सांगितले की, "सोमवारी पहाटे मुसळधार पावसामुळे लोरानमधील डोमिला धूक भागात एका मातीच्या घरांवर दरड कोसळली, ज्यात 7 जणांचा मृत्यू झाला."
त्याआधी, डोडा जिल्ह्यातील जम्मू-किश्तवाड राष्ट्रीय महामार्गावरील रग्गी नाल्याजवळ एका टेकडीवरून खाली आलेला दगड एका प्रवासी बसवर आदळला. सकाळी साडे नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. "या घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले," असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
जिल्ह्यातील काष्टीगड भागात, शिव देवी नावाच्या महिलेचा घराशेजारी दगड लागल्याने मृत्यू झाला. तसेच, अचानक आलेल्या पुरात वाहून गेलेल्या विकास अहमदचा मृतदेह राजौरी शहरातील सलानी भागात सापडला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे पूंछ, राजौरी आणि डोडा या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाशी संबंधित घटनांमध्ये बळी पडलेल्यांची एकूण संख्या रविवारी 11 होती ती आता 22 वर पोहोचली आहे. तर अनेकजण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी मृतांच्या नातेवाईकांसाठी 6 लाख रुपयांची सानुग्रह मदत जाहीर केली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यातील कपकोट भागात दुथडी भरून वाहणाऱ्या सरयू नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने एक बालक बेपत्ता झाले. तर पिथौरागढ जिल्ह्यातील धारचुला भागातील 'फू' गावाजवळील जंगलात वीज पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. भारतीय हवामान विभागाने (IMD) डेहराडून, टिहरी आणि हरिद्वार जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला आहे. तर उर्वरित जिल्ह्यांसाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
दरम्यान, नागालँडचे मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी सोमवारी भूस्खलनाचा फटका बसलेल्या 'मोन' शहराला भेट दिली. या शहरात आदल्या दिवशी नऊ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. रविवारी चार मृतदेह सापडले होते आणि सोमवारी आणखी दोन मृतदेह सापडल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. "आतापर्यंत एकूण सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी दोन व्यक्ती बेपत्ता असून शोध आणि बचाव कार्यात सहभागी स्वयंसेवक त्यांचा शोध घेत आहेत," अशी माहिती मोनचे उपायुक्त वेन्नी कोन्याक यांनी दिली. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील हबीबपूर गावात रविवारी उशिरा मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याने चार मुलांसह एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जिल्हा प्रशासनाने सोमवारी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली.