दोहा : कतारमधील ‘रास लाफान’ येथील द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG) प्रकल्पात रविवारी झालेल्या स्फोटात 12 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती कतारच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे, अशी माहिती कतारमधील भारतीय दूतावासाने दिली. “कतारच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली आहे की, काल रात्री रास लाफान येथे झालेल्या घटनेत दुर्दैवाने 12 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आम्ही शोकाकुल कुटुंबांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि मृतांच्या आत्म्यास शांती लाभो यासाठी प्रार्थना करतो,” असे दूतावासाने एका निवेदनात म्हटले आहे. या स्फोटात किमान 13 जण ठार आणि 66 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती त्या मध्य-पूर्वेकडील देशाच्या ऊर्जा मंत्र्यांनी सोमवारी दिली. “आज मला अशा गोष्टीची घोषणा करावी लागत आहे, जी कधीही घडू नये, अशी माझी नेहमीच इच्छा होती. ती म्हणजे भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकत्व असलेल्या आपल्या 13 लोकांचा झालेला दुर्दैवी मृत्यू,” असे कतारचे ऊर्जा मंत्री साद अल-काबी यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.
ऊर्जा मंत्र्यांनी नमूद केले की, या स्फोटात इतर 66 जण जखमी झाले आहेत. मार्चमध्ये इराणने केलेल्या हल्ल्यानंतर येथील कामकाज थांबवण्यात आले होते. कामगार ते पुन्हा सुरू करत असतानाच हा स्फोट झाला. या घटनेत किती भारतीय नागरिक मृत्युमुखी पडले, याबद्दल मंत्र्यांनी कोणताही तपशील दिला नाही. “एकूण 66 जण जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यापैकी कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही,” असे अल-काबी यांनी सांगितले.
रविवारी संध्याकाळी, बार्झान येथील स्थानिक गॅस पुरवठा केंद्रावर ‘तांत्रिक बिघाडामुळे अपघात’ झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. कतारच्या ऊर्जा मंत्रालयाने स्पष्ट केले की, या अपघातामुळे प्रकल्पाच्या निर्यात क्षमतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. तसेच पर्यावरणालाही कोणताही धोका निर्माण झालेला नाही. “यामुळे जागतिक स्तरावरील आमच्या निर्यातीवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही,” असे साद अल-काबी यांनी सांगितले. तसेच, “ही केवळ एक अपघाताची घटना होती; यात कोणताही घातपात किंवा शत्रुत्वाची भावना नव्हती,” असेही त्यांनी नमूद केले.
Qatari authorities have confirmed that 12 Indian nationals have unfortunately passed away in the Ras Laffan incident yesterday night. We extend our deepest condolences to the bereaved families and prayers for the departed souls. Qatari authorities have also confirmed that all… — India in Qatar (@IndEmbDoha) June 22, 2026
प्लांटमध्ये स्फोट नेमका कुठे झाला, याबद्दल कतार एनर्जीने कोणताही तपशील दिला नाही. स्फोटामुळे झालेल्या नुकसानीचे नेमके प्रमाणही उघड करण्यात आले नाही. तथापि, अल-काबी यांनी सांगितले की, या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. बरझान प्लांटची क्षमता दररोज जवळपास 1.4 अब्ज स्टँडर्ड क्यूबिक फूट विक्रीयोग्य गॅसची होती. ज्याचा वापर कतार प्रामुख्याने स्थानिक वीज निर्मितीसाठी आणि अरबी द्वीपकल्पाच्या वाळवंटी प्रदेशातील आपल्या महत्त्वाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पांना ऊर्जा देण्यासाठी करत असे. मार्च महिन्यात रास लाफानवरही हल्ला झाला होता. जेव्हा एका इराणी क्षेपणास्त्राने या सुविधेला लक्ष्य केले. ज्यामुळे आग लागून ‘मोठ्या प्रमाणात’ नुकसान झाले.