हेमंत जाधव
द्राक्ष उत्पादकांची सध्याची अवस्था म्हणजे “बापापरी बाप गेला आणि बोंबलतांना हातही गेला” अशी झाली आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाने नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक पुरता हतबल झाला आहे. जी द्राक्ष आहेत ती विकली जात नाहीत आणि वरून पावसाचा जोरदार तडाखा बसत आहे.
द्राक्ष उद्योगाला २०१३ पासून हळूहळू उतरती कळा लागली आहे. गारपीट, अवकाळी पाऊस, नोटबंदी, कोरोना आदी कारणांचा मागील काही वर्षांपासून सातत्याने द्राक्ष उद्योगाला फटका बसत आहे. सीझन दर सीझन द्राक्ष उत्पादित करणे व विक्री करणे खूप जिकीरीचे होत आहे. दिवसेंदिवस रोग वाढत आहेत, मजुरी वाढली आहे. डिझेलचे भाव असतील किंवा खते – औषधे असतील दरवर्षी वाढत आहे. एकरी होणारा खर्च मागील वीस वर्षात चारपट वाढला आहे त्या तुलनेत द्राक्षाचे भाव (देशांतर्गत) दुप्पट सुद्धा झाले नाही. मग हा सगळा ताळमेळ कसा बसणार?
वट राजाची वागणूक कैकाड्याची… ही म्हण खरी ठरताना दिसते आहे. द्राक्ष उत्पादक म्हटला की देशभरात त्याच्याकडे एका वेगळ्याच दृष्टीने बघितले जाते. तो हुशार आहे, अभ्यासू आहे, ज्ञानी आहे, खर्चाची ऐपत आहे, धोका पत्करण्यात अग्रेसर आहे असे समजले जाते. द्राक्ष उत्पादित करणारे नाशिक, सांगली हे दोन जिल्हे म्हणजे जणू कुबेराच्या नगरी…. पण मागील आठ वर्षात हा समज शुद्ध गैरसमज झाला आहे. आज द्राक्ष शेतकरी मेटाकुटीला आला आहे. आहे तो माल घ्यायला व्यापारी नाही वरून अवकाळी पावसाचा आणि गारपीटीचा जबरदस्त तडाखा त्याला बसत आहे.
सरकारी धोरणापुढे आधीच झालेली हतबलता, निसर्गाचा प्रकोप,वाढलेली महागाई ह्या तिहेरी संकटापुढे उत्पादक अक्षरशः मोडून पडला आहे. काही उत्पादकांना वर्षभर केलेल्या खर्चाइतपत पैसे हातात आले नाही. मग त्यांनी आता यापुढे दुकानदारांची खते, औषधीची उधारी कशी फेडायची. द्राक्ष बागांच्या भरवशावर वर्षभर केलेली किराणा, कपडे, वीज बिल , गिरणी इ. उधारी कशी भरायची ? सोसायटी, बँका, किरकोळ हात उचल कसे फेडायचे ? मुलांचे फी, लग्न कार्ये, पुढील हंगामासाठीची तयारी कशी करणार ? असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभे आहेत!!
यावर काय उपाययोजना करता येतील ह्याचा विचार करायचा झाल्यास आपल्या गरजा कमी करून काटकसरीने वागणे हे वरवर वाटतंय पण वाढलेल्या महागाईत कसे नियोजन करावे हे एक मोठे आव्हानच आहे.
शेतकरी काय करू शकतात ?
व्यसने कमी करणे
वैयक्तिक खर्च जपून करणे
शुभ कार्यांवरील खर्च मर्यादीत करणे
आर्थिक ताकदीचा अंदाज घेऊन मुलांना सरकारी किंवा अनुदानीत शाळेत घालणे
गाड्या घेताना, वापरताना आधी आपली उत्पादकता तपासून घेणे
खतांचा आणि औषधांचा सुयोग्य पद्धतीने वापर करणे
रोग येऊ नये म्हणून आधीच उपाययोजना कराव्यात
शेती एक शास्त्र आहे,त्यात सतत शिकत राहा, माहिती मिळवत राहा
बचत करा, कारण संकटकाळी तोच पैसा कामी येतो