नवी दिल्ली, २१ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : रामाच्या प्राणप्रतिष्ठेला ४८ तासांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. केंद्र सरकारने देशातील सर्व प्रसारमाध्यमांना आणि समाजमाध्यमांना उद्देशून एक इशारापत्र प्रसिद्ध केले आहे. चुकीची माहिती प्रसिद्ध केल्यास चौकशी होईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल. खोटी, दिशाभूल करणारी, चिथावणी देणारी माहिती प्रसिद्ध करणाऱ्यांना अटक होऊ शकते. दोषींवर दंडात्मक कारवाई होऊ शकते अथवा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते; अशा स्वरुपाचे इशारापत्र केंद्र सरकारने काढले आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने हे इशारापत्र प्रसिद्ध केले आहे.
जर कोणी खोटी, दिशाभूल करणारी, चिथावणी देणारी माहिती समाजमाध्यमातून प्रसिद्ध केल्याचे आढळले तर संबंधित व्यक्तीवर कारवाई होईल. ही कारवाई होण्याआधीच संबंधित समाजमाध्यमाला सदोष माहिती ब्लॉक करावी लागेल अर्थात माहिती कोणालाही दिसणार नाही याची व्यवस्था करावी लागेल.
एका बहुराष्ट्रीय ई – कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून ‘श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद’ नावाने मिठाई विकली जात होती. या फसवणूक प्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने बहुराष्ट्रीय ई – कॉमर्स प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आहे. बहुराष्ट्रीय ई – कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून तूप बुंदी लाडू, मावा खवा लाडू, रघुपती तूप लाडू, देशी गायीच्या दुधाचा पेढा या मिठाईची विक्री ‘श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद’ नावाने सुरू होती. नोटीस येताच बहुराष्ट्रीय ई – कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘श्रीराम मंदिर अयोध्या प्रसाद’ नावाने सुरू असलेली मिठाई विक्री थांबवली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.