पुणे शहरातील वाघोली या ठिकाणी एका गोडाऊनला भीषण आग लागली. यात दुर्देवाने तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसेच अग्निशमन दलाच्या आणि पुणे महानगरपालिकेच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
पुण्यातील वाघोली परिसरात अचानक गोडाऊनला आग लागली. रात्री ११:४५ च्या दरम्यान ही घटना घडली. हे मंडपाचं गोडाऊन होतं. या गोडाऊनच्या शेजारी ४०० सिलेंडर होते. त्यामुळे मोठा स्फोट झाला. ही घटना कळताच अग्निमन दलाची वाहनं घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीत जवानांना तीन कामगारांचे मृतदेह आढळून आले. या आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
आगीत होरपळून ३ जणांचा मृत्यू
गोडाउनच्या शेजारीच ४०० सिलेंडर होते. त्यातील ३ सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. आग विझवल्यानंतर या आगीत तीन जणांचे मृतदेह आढळले. हे तिन्हीजण याच गोडाऊनमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. होरपळून तिघांचा मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय तिघांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.