तुर्की आणि सिरीयामध्ये काल झालेल्या भुकंपातील बळींची संख्या 9 हजारापेक्षा अधिक झाली आहे. अजूनही बचावकार्य सुरू आहे. उणे तापमानात शोधपथके पीडीतांना बाहेर काढण्याच्या कामात गुंतले असून, आंतरराष्ट्रीय मदत तुर्कीमध्ये पोहोचत आहे. तुर्कीपाठोपाठ आता भूकंपग्रस्त सीरियाला देखील भारताने मदत साहित्य पाठवले आहे. वायव्य सीरियामध्ये ६ फेब्रुवारीला आलेल्या भीषण भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने हवाई दलाच्या विशेष विमानाद्वारे सहा टन आपत्कालीन मदत साहित्य पाठविले आहे.
धातू आणि काँक्रीटच्या ढिगाऱ्यांमुळे शोधकार्यात अडथळे निर्माण होत असून, उणे तापमानामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांच्या जीविताची चिंता निर्माण झाली आहे. आत्तापर्यंत ढिगाऱ्याखालून ८ हजार लोकांना वाचवण्यात यश आले असून, सुमारे ४ लाख निर्वासितांना सरकारी व्यवस्था किंवा हॉटेल्समध्ये आश्रय देण्यात आला आहे. तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या ८५ दशलक्ष लोकांपैकी १३ दशलक्ष लोकांना भूकंपाचा फटका बसला आहे. एर्दोगेन यांनी १० प्रांतांमध्ये आणीबाणी जाहीर केली आहे.
भूकंपातील मृतांची संख्या नऊ हजारांच्या वर गेली असल्याने हा गेल्या दशकभरातील हा सर्वांत विनाशकारी भूकंप ठरला आहे. नेपाळला २०१५ मध्ये बसलेल्या ७.८ रिश्टरच्या भूकंपाच्या धक्क्यात ८,८०० जणांचा मृत्यू झाला होता. तुर्की आणि सीरियात साठ हजारांहून अधिक बचाव आणि मदत पथकांचे जवान जनतेला मदत करत आहेत. आज एका स्लॅबखाली अडकलेल्या लहान मुलाला अनेक प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. त्याचे वडिलही भूकंपात थोडक्यात वाचले होते. आतापर्यंत साधारण आठ हजार लोकांना वाचविण्यात आले आहे.