संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विरोधकांनी केलेल्या चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत उत्तर देत आहेत.
पंतप्रधान म्हणाले, राष्ट्रपतींनी आपल्याला आणि देशातील कोट्यवधी जनतेला मार्ग दाखवला आहे.त्यांची उपस्थिती देशातील भगिनी आणि मुलींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी आदिवासी समाजाचा अभिमान वाढवला आहे. यामुळे त्यांचा अभिमान वाटतो. हे बोलून पंतप्रधान मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली.
तसेच मोदी म्हणाले, “शंभर वर्षांत न पाहिलेली महामारी, विभागलेलं जग, दुसरीकडे युद्धाची स्थिती यामधूनही देश ज्यापद्धतीने सावरला आहे, ते अभिमानास्पद आहे. आव्हानं येत असतात, पण या आव्हानांना पुरून उरलं आहे 140 कोटी भारतीयांचं सामर्थ्य आहे. अनेक देशातील अस्थिरता, आजूबाजूच्या देशात महागाई वाढली आहे, अशावेळी भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. जग भारताकडे आशेनं पाहात आहे. भारताली जी 20 समूहाच्या अध्यक्षतेची संधी मिळाली, ही देशासाठी गौरवाची बाब आहे.” असे मोदी म्हणाले.