महाराष्ट्र गृहविभागाने 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली आहे. मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्त पदाचा पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला असून मुंबई पोलिसांच्या इतिहासात विशेष पोलीस आयुक्त या पदाची पहिल्यांदाच निर्मिती करण्यात आली आहे. भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
आयपीएस देवेन भारती यांनी आज (गुरुवार) पदभार स्वीकारला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार यापुढच्या काळात सर्व सहपोलीस आयुक्त विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना रिपोर्ट करणार आहेत. विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे मानले जातात. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांंच्यावर पोलीस सहआयुक्त म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली होती. ते महाराष्ट्र ATS चे प्रमुख देखील होते. त्यानंतर भारतींना अतिरिक्त पोलिस महासंचालकपदी बढती देऊन दहशतवादविरोधी पथकात पाठवण्यात आलं. मविआच्या काळात भारतींना साईड पोस्टिंग देण्यात आली होती. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक बनवण्यात आलं होतं. डिसेंबर महिन्यात त्यांच्यावर सहपोलीस आयुक्त वाहतूक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.