सांगलीतील आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद आता पुन्हा एकदा चिघळला आहे. शिवप्रेमींनी गनिमी काव्याने रातोरात बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अखेर पोलीस बंदोबस्तात प्रशासनाकडून हटवण्यात आला आहे. परिसरामध्ये 144 कलम लागू करण्यात आलं होतं. मात्र रात्री संपूर्ण परिसरातील लाईट घालवुन महाराजांचा पुतळा रात्री पोलीस बंदोबस्तामध्ये हटवण्यात आला आहे. म्हणून प्रशासनाच्या निषेधार्थ शिवभक्तांनी अष्टा वाळवा इस्लामपूर बंदची आज हाक दिली आहे आष्टा परिसरात पूर्णता शांतता दिसून येत आहे.
आष्टा शहरात गेल्या ९ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची दोनदा प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटेच्या सुमारास शिवप्रेमींनी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ फुटी अश्वारूढ पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.
दरम्यान प्रशासनाकडून पुतळा हटवण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर आष्टा शहरातील सांगली- इस्लामपूर रस्त्यावर भाजपा नेते निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींनी रास्ता रोका केला आहे. त्यामुळे पुतळा हटवल्याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पुतळ्याच्या परिसरामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.