अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना काल लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र नवनीत राणा यांना लीलावती रुग्णालयात मिळालेल्या उपचारावर शिवसेनाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत, तसेच व्हायरल झालेल्या फोटोंवरून आक्षेप घेण्यात आले आहेत. नवनीत राणांच्या उपचारांबाबत जाब विचारण्यासाठी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे , शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते लीलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत, नवनीत राणांचा रिपोर्ट मिळाल्याशिवाय इथून हलणार नाही, असा आक्रमक पवित्रा शिवसेनेकडून घेण्यात आला आहे.
स्पाँडिलायटीस असताना उशी वापरणे, एमआरआय रुममध्ये कॅमेऱ्याचा यंत्रांना आणि रुग्णांना धोका असतानाही त्यांचा वापर करणं, या सर्व गोष्टींवरून नवनीत राणा यांनी उपचाराचे नाटक केलं. असंच दिसतंय, अशी टीका ही किशोरी पेडणेकर यांनी केली आहे.
काय आहे प्रकरण
राणा दाम्पत्याने शनिवारी २३ एप्रिल मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे ते मुंबईत दाखल झाले होते. मात्र, राणा दाम्पत्याच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले असून त्यांच्या खार येथील घराला चहू बाजूंनी शिवसैनिकांनी घेराव घातला होता. त्यामुळे त्यांना हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मातोश्रीसमोर पोहचता आले नाही. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यामुळे राणा दाम्पत्यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं सांगितलं. मात्र, घडल्या प्रकरणाच्या परिणामी राणा दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती.. त्यानंतर राणा दाम्पत्यानं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. अखेर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला.