अमेरिकेसह जगातील अनेक देशांमध्ये लोकप्रिय व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब अचानक बंद पडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. इंटरनेट सेवा खंडित होण्यावर नजर ठेवणाऱ्या डाउनडिटेक्टर संकेतस्थळानुसार सुमारे तीन लाख वापरकर्त्यांनी यूट्यूब सेवा बंद झाल्याची नोंद केली आहे.
डाउनडिटेक्टरच्या आकडेवारीनुसार, सुमारे 16 टक्के वापरकर्त्यांनी ॲप डाउनलोड न होण्याची तक्रार केली आहे, तर 16 टक्के वापरकर्त्यांनी व्हिडिओ स्ट्रीमिंग बंद पडल्याचे म्हटले आहे. तसेच 10 टक्के वापरकर्त्यांना संकेतस्थळावर अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे.
सेवा खंडित होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिका, कॅनडा, युनायटेड किंगडम आणि इतर काही देशांमध्ये या आउटेजचा परिणाम जाणवत असल्याचे वृत्त आहे. भारतातही काही वापरकर्त्यांनी यूट्यूब सेवा बंद पडल्याची तक्रार केली आहे.
सोशल मीडियावर अनेकांनी यूट्यूबबरोबरच गूगल, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस आणि क्लाउडफ्लेअर या सेवांमध्येही अडथळे येत असल्याचे म्हटले आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
TeamYouTube ने सेवा खंडित झाल्याची कबुली दिली असून, “आम्ही या समस्येची दखल घेतली आहे आणि त्याचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सध्या तत्काळ उपाय उपलब्ध नाही, मात्र आम्ही वापरकर्त्यांना अद्ययावत माहिती देत राहू,” असे निवेदन जारी केले आहे. गूगल सपोर्ट पेजवरही यूट्यूबच्या होमपेज, शिफारसी (Recommendations) आणि शोध (Search) यामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत माहिती देण्यात आली आहे.
If you’re having trouble accessing YouTube right now, you’re not alone — our teams are looking into this and will follow up here with updates: https://t.co/7iTU5S9AgT — TeamYouTube (@TeamYouTube) February 18, 2026
दरम्यान, ही समस्या नेमक्या किती वेळात दूर होईल याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही कालमर्यादा जाहीर केलेली नाही. जगभरातील लाखो वापरकर्ते सध्या यूट्यूब सेवापूर्ववत होण्याची प्रतीक्षा करत आहेत.