Thailand Cambodia Dispute: भगवान विष्णूंच्या मूर्तीची विटंबना; थायलंड-कंबोडिया सीमेवरील घटनेवर भारताचा तीव्र संताप

थायलंड-कंबोडिया सीमेवर भगवान विष्णूंची मूर्ती पाडल्याच्या घटनेनंतर भारताने तीव्र निषेध नोंदवला आहे. या कृत्यामुळे जागतिक भाविकांच्या भावना दुखावल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.

Thailand Cambodia Dispute: भगवान विष्णूंच्या मूर्तीची विटंबना; थायलंड-कंबोडिया सीमेवरील घटनेवर भारताचा तीव्र संताप

Thailand Cambodia dispute: थायलंड आणि कंबोडिया या दोन आग्नेय आशियाई देशांमधील सीमावादाने आता गंभीर सांस्कृतिक व धार्मिक वळण घेतले आहे. थायलंड-कंबोडिया सीमेवर उभारण्यात आलेली भगवान विष्णूंची मूर्ती पाडण्यात आल्याचा प्रकार समोर आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या घटनेनंतर भारताने तीव्र नाराजी व्यक्त करत या कृत्याचा निषेध केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमावादग्रस्त भागात २०१४ साली उभारण्यात आलेली भगवान विष्णूंची मूर्ती बुलडोझरच्या सहाय्याने पाडण्यात आली. हा प्रकार थायलंडच्या लष्कराकडून झाल्याचा दावा केला जात असून, यासंदर्भातील व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मूर्ती पाडण्याचे दृश्य पाहून जगभरातील हिंदू समाजातून संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट शब्दांत निषेध नोंदवला आहे. मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, “हिंदू आणि बौद्ध देवता या या संपूर्ण प्रदेशातील लोकांसाठी अत्यंत पूजनीय आहेत. त्या केवळ धार्मिकच नव्हे, तर या भागाच्या सामायिक सांस्कृतिक वारशाचाही एक महत्त्वाचा भाग आहेत.” अशा प्रकारच्या कृत्यांमुळे जगभरातील भाविकांच्या भावना दुखावल्या जातात, असेही त्यांनी नमूद केले.

हेही वाचा:High Waged Employees : ट्रम्प प्रशासनाने ‘लॉटरी’ पद्धत केली बंद, आता उच्च पगारदार उमेदवारांनाच प्राधान्य

भारताने या निवेदनात थायलंड आणि कंबोडिया या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आणि संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. भूभागावरील वाद काहीही असले, तरी सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाला हात लावणे योग्य नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. अशा घटनांमुळे केवळ तणाव वाढतोच, पण परस्पर संबंधांवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो, असे मत परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केले आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावाद हा नवीन नाही. यावर्षी जुलै महिन्यात दोन्ही देशांमध्ये या सीमावादामुळे संघर्ष निर्माण झाला होता. त्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली होती. मात्र अलीकडच्या काळात पुन्हा एकदा तणाव वाढताना दिसत आहे.

हेही वाचा: Plane Crash Turkey : आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ ! पाकिस्तान-लिबिया शस्त्र करारानंतर लष्करप्रमुखांचा संशयास्पद मृत्यू

या आधीही कंबोडियाकडून सीमावादग्रस्त भागातील काही हिंदू मूर्तींची तोडफोड झाल्याचा आरोप थायलंडने केला होता. त्यामुळे दोन्ही देश एकमेकांवर सांस्कृतिक वारशाचा अपमान केल्याचे आरोप करत आहेत. सद्यस्थितीत थायलंडच्या अधिकृत प्रशासनाकडून भगवान विष्णूंच्या मूर्ती पाडण्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या घटनेमुळे सीमावाद आता केवळ भूभागापुरता न राहता धार्मिक आणि सांस्कृतिक पातळीवरही गेला असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. आंतरराष्ट्रीय समुदायानेही या घटनेची दखल घेऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number