Gmail Update: आजच्या डिजिटल युगात ईमेल आयडी ही केवळ संवादाची साधनं नसून, व्यक्तीची ओळख बनली आहे. अनेकांनी शाळा किंवा कॉलेजच्या काळात तयार केलेले Gmail आयडी आजही वापरात आहेत. मात्र, काळानुसार हे आयडी काहीसे अनप्रोफेशनल वाटू लागतात. अशावेळी नवीन आयडी तयार करण्याचा विचार केला जातो, पण त्यात जुने महत्त्वाचे ईमेल्स, डॉक्युमेंट्स आणि कॉन्टॅक्ट्स गमावण्याची भीती अनेकांना असते.
याच समस्येवर उपाय म्हणून गुगलने एक महत्त्वाचं अपडेट आणलं आहे. या नव्या सुविधेमुळे आता युजर्सना आपला Gmail आयडी बदलणे अधिक सोपं झालं आहे. विशेष म्हणजे, नवीन आयडी घेताना जुन्या मेल्सची कोणतीही हानी होत नाही. त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे तुमचा जुना आयडी बदलू शकता.
या फीचरमुळे तुमचा जुना Gmail पत्ता पूर्णपणे नष्ट होत नाही, तर तो ‘अल्टरनेट’ आयडी म्हणून कायम राहतो. म्हणजेच, जुन्या आयडीवर आलेले ईमेल्स देखील तुमच्या सध्याच्या इनबॉक्समध्येच मिळत राहतात. त्यामुळे कोणतीही माहिती हरवण्याचा धोका राहत नाही. तसेच, तुम्ही जुना किंवा नवीन दोन्ही आयडी वापरून Google च्या विविध सेवांमध्ये लॉगिन करू शकता.
Gmail आयडी बदलण्याची प्रक्रिया देखील अत्यंत सोपी आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या Google अकाउंटच्या सेटिंग्जमध्ये जावे लागते. तिथे ‘पर्सनल इन्फॉर्मेशन’ या पर्यायात जाऊन ‘Email’ सेक्शन निवडावा लागतो. जर तुमच्या अकाउंटसाठी हे फीचर उपलब्ध असेल, तर ‘Change Google Account Email’ असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही नवीन युजरनेम निवडू शकता. मात्र, हे नाव युनिक असणे आवश्यक आहे.
एकदा नवीन नाव निवडल्यानंतर, काही सोप्या स्टेप्स पूर्ण करून तुम्ही बदल निश्चित करू शकता. त्यानंतर तुम्ही दोन्ही आयडीने लॉगिन करू शकता आणि सर्व ईमेल्स पूर्वीसारखेच सुरक्षित राहतात.
तथापि, या सुविधेसोबत काही मर्यादाही आहेत. तुम्ही वर्षातून एकदाच Gmail आयडी बदलू शकता आणि एकूण तीन वेळाच हा बदल करण्याची परवानगी दिली जाते. त्यामुळे योग्य विचार करूनच हा निर्णय घेणे आवश्यक आहे. तसेच, बदल करण्यापूर्वी तुमच्या डेटाचा बॅकअप घेणे अधिक सुरक्षित ठरते.
सध्या ही सुविधा काही देशांमध्ये सुरू झाली असून, लवकरच इतर युजर्ससाठीही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. एकूणच, या नव्या अपडेटमुळे Gmail वापरणाऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. आता प्रोफेशनल आयडीसाठी नवीन अकाउंट उघडण्याची गरज नाही, तर काही मिनिटांतच तुमचा ईमेल आयडी अपडेट करता येणार आहे.