B.Ed CET Exam: नागपूरसह राज्यभरात आज आयोजित करण्यात आलेल्या बीएड सीईटी परीक्षेदरम्यान मोठा तांत्रिक गोंधळ उडाला. नागपुरातील ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट’ या परीक्षा केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे वेळेवर परीक्षा सुरू होऊ शकली नाही, परिणामी शेकडो विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. केवळ नागपुरातच नव्हे, तर राज्यातील इतर अनेक केंद्रांवरही अशीच परिस्थिती उद्भवल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण असून अनेक ठिकाणी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
संगणक आणि नेटवर्क सुविधेचा अभाव; विद्यार्थ्यांचे केंद्राबाहेर आंदोलन
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षेसाठी केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना ऐनवेळी संगणक आणि नेटवर्क सुविधा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. तासनतास वाट पाहूनही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने विद्यार्थ्यांनी केंद्र प्रशासनाला जाब विचारला. भविष्यातील करिअरसाठी महत्त्वाची असलेली ही परीक्षा अशा प्रकारे व्यवस्थापनाच्या गलथानपणामुळे रखडणे दुर्दैवी आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. परीक्षेसाठी लांबून आलेल्या विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
व्यवस्थापनाचा ‘खेळखंडोबा’; एजन्सीच्या कामावर प्रश्नचिन्ह
सीईटी सेलकडून परीक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी ‘अॅक्सेस इन्फ्रा’ (Access Infra) या कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीने पुढे तिसऱ्याच एका सॉफ्टवेअर कंपनीला तांत्रिक कामकाजाचे कंत्राट सोपवले होते. मात्र, प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी सॉफ्टवेअर आणि नेटवर्कमध्ये गंभीर त्रुटी निर्माण झाल्या. कंत्राटी पद्धतीमुळे परीक्षा व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाला असून, जबाबदार कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता पालकांनकडून आणि विद्यार्थी संघटनांकडून केली जात आहे.
हेही वाचा – Dhananjay Mude : “जन्मताच ‘तो’ त्रास, तरी कसा वाचलो देव जाणे” धनंजय मुंडेंनी बोलून दाखवली मनातील खंत
राज्यभरातील परीक्षा केंद्रांवर सावळा गोंधळ
हा तांत्रिक बिघाड केवळ एका केंद्रापुरता मर्यादित नसून राज्याच्या विविध भागांतून अशाच प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सर्व्हर डाऊन होणे किंवा लॉगिनमध्ये अडचणी येणे यांसारख्या तांत्रिक समस्यांमुळे परीक्षा प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला. सीईटी सेलने या गोंधळानंतर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट केली नसली, तरी ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा होऊ शकली नाही, त्यांच्यासाठी फेरपरीक्षा किंवा नवीन तारखा जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.