नीट पेपरफुटीनंतर आता एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगरचे ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे. ही परीक्षा 22 मार्च रोजी होणार होती मात्र 20 मार्चलाच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपवर फिरल्याची माहिती ऋषिकेश गांगर्डे यांनी दिली. यासंदर्भात आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी देखील आक्रमक भूमिका घेत एमपीएससी औषध निरीक्षक भरती परीक्षा प्रश्नपत्रिका पेपर फुटी प्रकरणी खळबळजनक पुरावे मांडले आहेत.
दरम्यान आता एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षा प्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. एमपीएससीकडे करण्यात आलेली तक्रार बनावट असून पुन्हा परीक्षा होणार नाही म्हणून बनाव रचल्याचे एमपीएससीच्या सूत्रांची माहिती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक परीक्षा 22 मार्चला ऑफलाईन परीक्षा झाली आणि 12 जूनला निकाल लागला. तसेच 1 ते 21 जुलै मुलाखती झाल्या. 22 जुलै रोजी यादी लागली, त्यानंतर 23 जुलैला ईमेलद्वारे एक तक्रार एमपीएससीकडे आली. एमपीएससीने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्रारदाराला दाखल केलेल्या तक्रारीचे सर्व पुरावे सादर करण्यास सांगितले. तसेच संबधित उमेदवार आणि तक्रारदार यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावण्यात आले.
यावेळी एमपीएससीच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, काल रात्री त्याच तक्रारदाराने एक मेल MPSC ला केली आणि ही तक्रार बनावट आहे, असे सांगितले. पुन्हा लवकर परीक्षा होणार नाही म्हणून पेपर फुटला अशी बतावणी करून पुन्हा परीक्षा घेण्यासाठी हा बनाव रचला, असे त्या तक्रारीत म्हटले आहे. 20 मार्च रोजी कथित संभाषण झालेल्या घटनेची तक्रार 24 जुलैपर्यंत इतक्या विलंबाने का झाली, याचाही तपास केला जात आहे. शिवाय काल आलेला ईमेल आणि सर्व संबंधितांची आज चौकशी केली जात आहे.