ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडत आहे. अशातच आता जोवाड चक्रीवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. ही स्थिती ३ डिसेंबरपर्यंत अधिक बळकट होऊन त्याचे रुपांतर चक्रीवादळात होईल आणि ते उत्तर-पश्चिम दिशेला पुढे सरकणार असल्याचा अंदाज हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. वादळ आणि हवामानातील बदलांमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
अंदमानच्या समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बुधवारपर्यंत पश्चिम-उत्तर आणि पश्चिमेकडे पुढे सरकणार आहे. बंगालच्या उपसागरात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. हे वादळ ४ डिसेंबरला आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे. आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवरही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच ईशान्यमधील राज्यांमध्येही ५ ते ६ डिसेंबरदरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.