Israel-US Vs Iran War: आखाती देशांमध्ये इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे जागतिक ऊर्जा बाजारात खळबळ माजली आहे. या युद्धाचा थेट परिणाम आता तुमच्या खिशावरच नाही, तर हातातल्या मोबाईलवरही होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. इंधन टंचाईमुळे टेलिकॉम टॉवरच्या उत्पादनावर आणि त्यांच्या देखभालीवर मर्यादा येत असल्याने, मोबाईल सेवा विस्कळीत होण्याचा धोका वर्तवण्यात येत आहे.
कॉलिंग आणि इंटरनेट स्पीडला बसणार फटका
युद्धामुळे उद्भवलेल्या इंधन टंचाईच्या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना उपलब्ध LPG पुरवठा केवळ घरगुती ग्राहकांना देण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, यामुळे टेलिकॉम टॉवर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना होणारा गॅस पुरवठा 5 मार्च 2026 पासून बंद झाला आहे. टॉवरच्या मजबुतीसाठी आवश्यक असणारी ‘गॅल्वनायझेशन’ प्रक्रिया ही गॅसवर आधारित असते. ही प्रक्रिया थांबल्यास नवीन टॉवर उभारणी आणि जुन्या टॉवर्सची देखभाल यात अडथळे येऊन कॉल ड्रॉप होणे किंवा इंटरनेटचा स्पीड मंदावणे असे प्रकार घडू शकतात.
टेलिकॉम क्षेत्राची सरकारकडे विशेष मागणी
टेलिकॉम टॉवर कंपन्यांची संघटना असलेल्या ‘डिपा’ (DIPA) ने या संदर्भात दूरसंचार विभागाला (DoT) पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे. टेलिकॉम सेवा ही आजच्या काळातील अत्यावश्यक सेवा आहे, त्यामुळे या क्षेत्राला गॅस बंदीच्या आदेशातून वगळण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. जर गॅस पुरवठा त्वरित सुरळीत झाला नाही, तर 5G नेटवर्कचा विस्तार थांबण्यासोबतच ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटीवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.
इंधन टंचाईचे सावट आणि भविष्यातील आव्हान
पश्चिम आशियातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. अशातच, टेलिकॉम टॉवर्सना बॅकअपसाठी लागणाऱ्या डिझेलच्या पुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘डिजिटल इंडिया’चा कणा असलेल्या या क्षेत्राला जर प्राधान्याने इंधन मिळाले नाही, तर बँकिंग, पेमेंट आणि इतर ऑनलाईन सेवांना मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे येत्या काळात सरकार यावर काय मध्यम मार्ग काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.