क्रूझवरील ड्रग्जप्रकरणी आर्यन खान एनसीबीच्या अटकेत होता. मुंबई उच्च न्यायालयाने आर्यनचा जामीन मंजूर करुन त्याची तुरुंगातून सुटका झाली आहे. मात्र आर्यनच्या सुटकेनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुप्रिया सुळे यांनी आर्यनच्या सुटकेबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘जर एखादा मुलगा निर्दोष असेल आणि त्याला २६ दिवस कोठडीत रहावे लागत असेल तर हा कुठला न्याय?’ असा सवाल खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्यन खानच्या सुटकेबद्दल केंद्राला केला आहे.
पुण्यातील आयोजित पत्रकार परिषदेत सुप्रिया सुळे यांना आर्यन खानच्या सुटकेबाबत प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्या म्हणाल्या, ‘मी एक आई म्हणून सुरूवातीला उत्तर देऊ इच्छित असून त्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून बोलते. एक आई म्हणून कुठल्याही आईला हा विषय दु:खाचा विषय आहे. कोणत्याही कुटुंबात असे घडले असते, तर दुर्दैवाची गोष्ट असल्याचे’ सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.