अमेरिकेतील प्रमुख शहरांमध्ये शनिवारी “नो किंग्ज” या घोषवाक्याखाली मोठ्या प्रमाणावर आंदोलन झाले. नागरिकांचा आरोप आहे की राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन लोकशाही संस्थांना कमकुवत करून देशाला एकाधिकारशाहीकडे जात आहे. आंदोलकांनी “Nothing is more patriotic than protesting” आणि “Resist Fascism” अशा घोषणा देत सरकारच्या धोरणांविरोधात आवाज उठवला. एका अहवालानुसार, अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर उतरले. वॉशिंग्टन डी.सी.मध्ये उलटा फडकावलेला अमेरिकन ध्वज हे आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले. जो ध्वज राष्ट्रीय संकटाचे प्रतीक मानला जातो.
या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पाठिंबाही लाभला. मिळालेल्या माहितीनुसार, डेमोक्रॅटिक पक्षाच्या आंतरराष्ट्रीय शाखेने बर्लिन, रोम, पॅरिस आणि स्वीडनमधील अमेरिकन दूतावासांसमोर एकात्मतेने निदर्शने केली. रिपब्लिकन पक्षाने या मोर्चांना “Hate America” सभा असे संबोधले, परंतु अनेक ठिकाणी नागरिकांनी आंदोलनाला एखाद्या उत्सवाप्रमाणे स्वरूप दिले. “We The People” या अमेरिकन राज्यघटनेतील प्रास्ताविकेचे बॅनर, ढोल, संगीत बँड, आणि पोर्टलँड मध्ये बेडकांच्या फुगवट्यांच्या वेशभूषेत सहभागी झालेले लोक, हे सर्व दृश्य या चळवळीचे अनोखे वैशिष्ट्य ठरले.
ट्रम्प यांनी आंदोलनावर थेट प्रतिक्रिया दिलेली नसली, तरी त्यांच्या प्रचारसंघाने X वर एक एआय निर्मित व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात ट्रम्प राजेशाही पोशाखात मुकुट घालून बाल्कनीवरून हात हलवताना दिसतात. “ते मला राजा म्हणत आहेत, पण मी राजा नाही,” असे ट्रम्प यांनी टीव्हीवरील एका कार्यक्रमात सांगितले. मिळालेल्या माहितीनुसार ट्रम्प सत्तेत परत आल्यानंतर हे तिसरे मोठे आंदोलन असून, सरकार बंदमुळे फेडरल सेवा ठप्प झाल्या आहेत. आयोजकांच्या मते, व्हाईट हाऊस, काँग्रेस आणि न्यायालयांमधील तणाव हे अमेरिकन लोकशाहीसाठी धोक्याचे लक्षण आहे.
वॉशिंग्टन डी.सी. येथे सिनेटर बर्नी सँडर्स आणि क्रिस मर्फी यांनी आंदोलकांना संबोधित केले, तर लोकप्रिय विज्ञानप्रचारक बिल नाय यांनी ट्रम्प प्रशासनावर “विज्ञान दडपल्याचा” आरोप केला. “ते विज्ञानाचा प्रसार न करता, त्याला रोखतात. आणि त्यामुळे आपल्या आरोग्य, कल्याण व स्पर्धात्मकतेवर विपरित परिणाम होतो,” असे ते म्हणाले. यूएसएआयडी मधून काढण्यात आलेल्या अधिकारी अमांडा नेचर म्हणाल्या, “कोणीही सरकार बंद ठेवण्यासाठी मत दिलेले नाही; लोकांना काम करणारे प्रशासन हवे आहे.”
शिकागोमध्ये इलिनॉयचे राज्यपाल जे.बी. प्रिट्झकर यांनी ट्रम्प आणि त्यांच्या सल्लागार स्टीफन मिलर यांच्यावर स्थलांतरित, कृष्णवर्णीय, LGBTQ समुदाय आणि विरोधकांवर अन्याय केल्याचा आरोप केला. “इतिहास आपल्याला आजच्या कृतींवरून ओळखेल,” असे ते म्हणाले. बॉस्टनमध्ये सिनेटर एलिझाबेथ वॉरेन यांनी “लोकशाहीच्या रक्षणासाठी शांततापूर्ण आंदोलन करणे ही खरी देशभक्ती आहे,” असे सांगत आंदोलकांचे कौतुक केले. टेक्सासमध्ये संभाव्य अशांततेच्या पार्श्वभूमीवर नॅशनल गार्ड तैनात करण्यात आले आहे.
या आंदोलनांमुळे अमेरिकेत लोकशाही मूल्ये आणि स्वातंत्र्याविषयी नव्याने चर्चा सुरू झाली आहे. “नो किंग्ज” ही चळवळ सध्या ट्रम्प प्रशासनाविरोधातील सर्वात मोठे प्रतीक ठरली असून, नागरिकांनी पुन्हा एकदा लोकशाही व संविधानाचे संरक्षण करण्याची शपथ घेतली आहे.