नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या अधिकाराबाबतची अंतिम सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 30 जून 2026 पासून सुरू झाली आहे. यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या युक्तिवादासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या फेब्रुवारी 2023 च्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले असून, सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडत आहे. दरम्यान, आजच्या सुनावणीत सर्व मुद्दे संकलित करून देण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. तर पुढील सुनावणीसाठी मंगळवार, 4 ऑगस्टची तारीख देण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले, गेल्या चार वर्षांमध्ये सुनावणी होत नसल्यामुळे या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्याची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेण्याची गरज आहे. 2023 मध्ये या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती.