बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भव्य विजय मिळवल्यानंतर आज 20 नोव्हेंबर रोजी बिहारमधील नवीन सरकार स्थापन होणार आहे. यावेळी नितीश कुमार हे बिहारचे पुढचे मुख्यमंत्री असतील हे स्पष्ट झालं आहे. हा शपथविधी सोहळा सकाळी 11:30 वाजता पाटण्यातील गांधी मैदानावर पार पडणार आहे. बुधवारी पाटण्यामध्ये तीन प्रमुख बैठका झाल्या. या बैठकीत नितीश कुमार यांची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एकमताने जेडीयू विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली.
दरम्यान या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रसायने आणि खते मंत्री जेपी नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी, राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नितीश कुमार हे 10 व्यांदा शपत घेणार असून बिहारचे 19 वे मुख्यमंत्री होणार आहेत. तर दुसरीकडे भाजपला उपमुख्यमंत्री होण्यासाठी दोन नवीन चेहरे हवे होते, त्यापैकी एक महिला असण्याची शक्यता होती. यावेळी नितीश कुमार यांनी सम्राट चौधरींसोबत काम करण्यास समाधान व्यक्त केले. मात्र त्यांचा प्रस्ताव स्विकारल्याने पक्षात असंतोष निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत, दोन्ही चेहरे बदलले पाहिजेत किंवा दोघांनाही पुन्हा बोलावले पाहिजे. यामुळे पक्षात पेच निर्माण होण्याची शक्यता वर्तावली जात आहे. आज नितीश कुमार यांच्यासोबत 20 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो. त्यानंतर, मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल, ज्यामध्ये 14 नवीन मंत्र्यांचा समावेश होण्याची अपेक्षा आहे, म्हणजेच नवीन सरकारमध्ये एकूण 34 मंत्र्यांचा समावेश होऊ शकतो.
यामध्ये भाजपकडून सम्राट चौधरी, विजय सिन्हा, रामकृपाल यादव, नितीन नवीन, मंगल पांडे यांची नावे संभाव्य मंत्री म्हणून घेण्यात येऊ शकतात. त्याचसोबत जेडीयू कोट्यातून संभाव्य मंत्रीसाठी विजय चौधरी, अशोक चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव, लेशी सिंग आणि श्रवण कुमार यांच्याबद्दल चर्चा आहे. लोकजनशक्ती पक्षाकडून राजू तिवारी, संजय पासवान आणि राजीव रंजन सिंह यांचा विचार केला जात आहे, तर एचएएमकडून जितन मांझी यांचा मुलगा संतोष सुमन यांचा उमेदवार आहे. उपेंद्र कुशवाहा यांच्या पत्नी स्नेहलता कुशवाहा यांचा आरएलएमकडून विचार केला जात आहे. या नेत्यांना मंत्रिमंडळात समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.