टी-२० क्रिकेट म्हणजे चौकार आणि षटकारांची बरसात, हे समीकरण आयपीएलच्या 19 व्या हंगामात पुन्हा एकदा तंतोतंत खरे ठरले. सवाई मानसिंह स्टेडियमवर धावांचा अक्षरशः पाऊस पडला. एका बाजूने युवा वैभव सूर्यवंशीचा शतकी झंझावात, तर दुसऱ्या बाजूने इशान किशन आणि अभिषेक शर्मा यांची ‘काटे की टक्कर’. मात्र, या अटीतटीच्या आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या लढतीत सनरायझर्स हैदराबादने बाजी मारली. राजस्थान रॉयल्सने दिलेले तब्बल 229 धावांचे डोंगराएवढे आव्हान हैदराबादने 9 चेंडू आणि 5 गडी राखून सहज पार केले. या विजयासोबतच ‘ऑरेंज आर्मी’ने स्पर्धेत त्यांची पकड आणखी घट्ट करत पाचव्या विजयाची नोंद केली आहे.
विशाल आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अडखळत झाली. खतरनाक जोफ्रा आर्चरने ट्रॅव्हिस हेडला अवघ्या 6 धावांवर माघारी धाडून सुरुवातीलाच धक्का दिला, पण या पडझडीनंतर अभिषेक शर्मा आणि इशान किशन यांनी मैदानात जो काही कहर केला, तो राजस्थानचे गोलंदाज आणि चाहते दीर्घकाळ विसरू शकणार नाहीत. या जोडीने 55 चेंडूंत 132 धावांची वादळी भागीदारी रचून सामन्याचे पारडे पूर्णपणे हैदराबादच्या बाजूने झुकवले. अभिषेकने 29 चेंडूंत 11 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 57 धावा कुटल्या, तर इशानने हैदराबादकडून सर्वाधिक 74 धावांची मॅच-विनिंग खेळी साकारली.
अभिषेक आणि इशान बाद झाल्यानंतरही हैदराबादच्या धावगतीला ब्रेक लागला नाही. मधल्या फळीत हेन्रीक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांनी आक्रमक फलंदाजी करत विजयाचा मार्ग सुकर केला. क्लासेनने 29 तर नितीशने 36 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. अखेरच्या षटकांमध्ये विजयासाठी केवळ औपचारिकता उरली होती, जी सलील अरोरा (नाबाद 8) आणि अनिकेत वर्मा (नाबाद 1) यांनी 18.3 षटकांत पूर्ण करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. हा विजय कर्णधार पॅट कमिन्ससाठीही अत्यंत खास ठरला, कारण त्याच्या नेतृत्वाखालील हैदराबादचा हा पहिलाच विजय आहे.
4️⃣h consecutive win ✅
4️⃣th highest successful chase in #TATAIPL history ✅#SRH paint the Pink City ORANGE with a clinical win ?? Scorecard ▶️ https://t.co/PVdpjhxVEy#TATAIPL | #KhelBindaas | #RRvSRH | @SunRisers pic.twitter.com/bKWZOIAgZo — IndianPremierLeague (@IPL) April 25, 2026
तत्पूर्वी, नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या राजस्थान रॉयल्सने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. विशेषतः युवा वैभव सूर्यवंशीची बॅट काल आग ओकत होती. त्याने हैदराबादच्या गोलंदाजांचा अक्षरशः पालापाचोळा करत अवघ्या 37 चेंडूंत 103 धावांची अविश्वसनीय शतकी खेळी केली. या तुफानी खेळीत त्याने तब्बल 12 गगनभेदी षटकार आणि 5 खणखणीत चौकार लगावले. वैभवच्या आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरे, तर हैदराबादविरुद्धचे पहिलेच शतक ठरले. त्याच्या या विक्रमी खेळीने स्टेडियममधील क्रिकेटरसिकांना अक्षरशः वेड लावले.
वैभवला दुसऱ्या बाजूने ध्रुव जुरेलचीही भक्कम साथ मिळाली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 112 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. जुरेलनेही 51 धावांची अर्धशतकी खेळी करत धावफलक वेगाने हलता ठेवला. या दोघांच्या फटकेबाजीमुळे राजस्थानने 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 228 धावांचा डोंगर उभारला होता. हैदराबादकडून एशान मलिंगाने सर्वाधिक 2 बळी घेतले. दुसरीकडे, राजस्थानच्या गोलंदाजीचा विचार केल्यास जोफ्रा आर्चर आणि ब्रिजेश शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर डोनोव्हन फरेराच्या वाट्याला 1 विकेट आली. मात्र, गोलंदाजांना हैदराबादच्या भक्कम फलंदाजीला वेसण घालण्यात अपयश आल्याने राजस्थानला या मोसमातील तिसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.