राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब आणि काही परिवहन अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करणारी तक्रार परिवहन विभागातील एका निलंबित अधिकाऱ्याने नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी या तक्रारीची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस उपायुक्त यांना दिले आहेत.
मोटार वाहन निरीक्षक असलेले गजेंद्र तानाजी पाटील यांनी १६ मे रोजी ही तक्रार पंचवटी पोलीस ठाण्यात दिली. उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे हे परिवहन विभागाच्या राज्यभरातील बदल्या कशा मॅनेज करतात, त्यासाठी कसे अर्थपूर्ण व्यवहार झालेले आहेत याचा तपशील तक्रारीत देण्यात आला. परिवहन मंत्री परब हे खरमाटे यांना संरक्षण देतात, असे या तक्रारीत म्हटले आहे.
मंत्री अनिल परब यांनी भ्रष्टाचाराचे सर्व आरोप फेटाळले
निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर ५ अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे. — Anil Parab (@advanilparab) May 29, 2021
‘निलंबित मोटार वाहन निरीक्षक निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी माझ्याविरुद्ध तसेच परिवहन आयुक्त व इतर ५ अधिकाऱ्यांविरोधात पंचवटी पोलीस स्टेशन, नाशिक येथे दिलेली तक्रार ही पूर्णतः निराधार व खोटी आहे.विभागातील अनेक तक्रारीच्या पार्श्वभूमीवर निलंबित झालेल्या अधिकाऱ्याने सूडबुद्धीने खोटे आरोप करून माझी व महाविकास आघाडी सरकारची बदनामी करण्याचे षडयंत्र आखले आहेमंत्र्यांवर आरोप करून राज्य सरकार या मंत्र्यांचे काहीही वाकडे करू शकत नाही असे भासवून उच्च न्यायालयामार्फत सीबीआय चौकशीची मागणी करणे आणि सरकार व मंत्र्यांची प्रतिमा मालिन करणे, या राजकीय हेतूने केलेली ही तक्रार आहे.या तक्रारीची नाशिक पोलीस चौकशी करीत असून, चौकशीअंती सत्य जनतेसमोर नक्कीच येईल’, असं ट्विट मंत्री अनिल परब यांनी केलं आहे.