ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ही घोषणा केली. ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी आज शिक्कामोर्तब केले. आज रेवदंडा येथे मुख्यमंत्र्यांनी आप्पासाहेबांची भेटही घेतली.
१४ मे १९४६ रोजी जन्म झालेले पद्मश्री डॉ.दत्तात्रेय तथा आप्पासाहेब धर्माधिकारी गेले ३० वर्ष निरुपण करत असून अंधश्रध्दा,बालमनावर संस्कार करण्यासाठी त्यांनी विशेष बालसंस्कार बैठक सुरु केल्या आणि आदिवासी वाडी, वस्त्यांवर व्यसनमुक्तीचे मोठे कार्यही केले. रायगड जिल्ह्यातील रेवदंडामध्ये आप्पासाहेबांचे प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण झाले. बालपणापासून त्यांना कीर्तन ,भजन, अध्यात्मिक वाचन याची आवड होती. याशिवाय त्यांना मैदानी खेळ व पोहणेही आवडायचे. तळागाळातील प्रत्येक मनुष्यासाठी, समाजाच्या सेवेसाठी आप्पासाहेबांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले आहे. या कार्याची सुरुवात त्यांचे वडील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी ह्यांनी १९४३ सालापासून केली होती आणि आज तेच कार्य, तेवढ्याच जोमाने, तत्परतेने जगभर पोहोचविण्याचे कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी करत आहेत.
“2022 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि पुरस्कार समितीने सर्वानुमते हा मानाचा पुरस्कार आप्पासाहेब यांना देण्याचा निर्णय घेतला असून याचा आम्हाला फार आनंद आहे. यापूर्वी पद्मश्री पुरस्कराने केंद्र सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अखंडपणे त्यांचं व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, वृक्षारोपण अशी अनेक सामाजिक कार्य आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात आपल्याला वाहून घेतलं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि शुभेच्छाही देतो,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
“आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार दिल्याने या पुरस्काराचीच उंची वाढली आहे. त्यांचं कार्य या समाजजीवनात प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलं आहे. अनेक उद्ध्वस्त होणारी कुटुंब त्यांची प्रेरणा, मार्गदर्शनामुळे वाचली आहेत,” अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.