LPG Shortage: सिलिंडरची साठेबाजी भोवली! घरात लपवून ठेवले होते 32 गॅस सिलिंडर; पोलिसांची मोठी कारवाई

एलपीजी गॅस तुटवड्याच्या अफवांदरम्यान प्रशासनाने देशभरात काळाबाजार आणि साठेबाजीविरोधात मोठी मोहीम सुरू केली आहे.

LPG Shortage: सिलिंडरची साठेबाजी भोवली! घरात लपवून ठेवले होते 32 गॅस सिलिंडर; पोलिसांची मोठी कारवाई

नवी दिल्ली: देशातील काही भागांत एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुटवड्याच्या अफवांमुळे नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली असताना प्रशासनाने साठवणूक आणि काळाबाजार करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई सुरू केली आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की देशात एलपीजीचा साठा पुरेसा आहे आणि नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र काही ठिकाणी वाढलेल्या मागणीचा गैरफायदा घेत सिलिंडर साठवून जास्त दराने विक्री करण्याचे प्रकार समोर आल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा आणि तामिळनाडू या राज्यांत मोठ्या प्रमाणावर छापेमारी मोहीम राबवण्यात येत असून शेकडो सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत.

उत्तर प्रदेशातील हापुड येथे देहात पोलीस ठाण्याच्या पथकाने एका घरावर छापा टाकून 32 घरगुती गॅस सिलिंडर जप्त केले. त्यापैकी 18 भरलेले तर 14 रिकामे सिलिंडर असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात रिहान नावाच्या आरोपीविरोधात जमाखोरी आणि काळाबाजार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छापेमारीदरम्यान मुख्य आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

बिहारमधील पटना जिल्ह्यातील शाहपूर परिसरात प्रशासनाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई केली. अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती की सिलिंडर गोदामात साठवून ते जास्त दराने विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. तपासादरम्यान 100 हून अधिक घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची तयारी प्रशासनाने दर्शवली आहे.

हेही वाचा: Mojtaba Khamenei Middle East Conflict: युद्धादरम्यान इराणची परिस्थिती अधिकचं चिंताजनक; इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी कोमात?

बिहारमधील अररिया जिल्ह्यातील फारबिसगंज येथेही मोठी कारवाई करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अभय कुमार तिवारी यांच्या नेतृत्वाखाली पोखर बस्ती परिसरातील एका घर आणि दुकानावर छापा टाकण्यात आला. येथे विविध कंपन्यांचे सुमारे 135 ते 150 एलपीजी सिलिंडर जप्त करण्यात आले. हे सिलिंडर कोणाच्या मालकीचे आहेत आणि त्यांचा साठा कशासाठी ठेवण्यात आला होता, याचा तपास प्रशासन करत आहे.

तामिळनाडूतील मदुरै येथे अवैध साठ्याविरोधातील आतापर्यंतची मोठी कारवाई करण्यात आली. कोविलपापकुडी परिसरातून दोन वेगवेगळ्या ठिकाणांवरून एकूण 398 गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यात 163 घरगुती आणि 235 व्यावसायिक सिलिंडर होते. या प्रकरणात पलानी मदन कुमारसह दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, ओडिशातील संबलपूर येथेही पोलिसांनी कारवाई करत एका व्यक्तीकडून 161 गॅस सिलिंडर आणि एक पिकअप व्हॅन जप्त केली. हे सिलिंडर कोणतीही वैध परवानगी न घेता साठवले आणि वाहतूक केली जात असल्याचे तपासात समोर आले. विशेष म्हणजे, सिलिंडरने भरलेली पिकअप व्हॅन अपघातग्रस्त झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वाहनाची तपासणी केली आणि मोठ्या प्रमाणात संशयास्पद परिस्थितीत सिलिंडर आढळले.

प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की एलपीजीच्या तुटवड्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. सरकारकडे पुरेसा साठा उपलब्ध असून कृत्रिम तुटवडा निर्माण करून नफा कमावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा: Amitabh Bachchan: 'एकामागोमाग एक सगळे सोडून जात आहेत…'; जिवलग मित्राच्या निधनाने अमिताभ बच्चन भावुक

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number