Crime at Mahakumbh Mela 2025 : कोणत्याही यात्रे-जत्रेच्या ठिकाणी हौशे-नवशे-गवशे असतातच, असं म्हटलं जातं. महाकुंभ मेळ्यात होणारी गर्दी पाहता इथे असे किती लोक आले असतील, सांगता येत नाही. अशाच एका व्यक्तीने या गर्दीचा फायदा घेऊन एक भयंकर हेतू साध्य करण्याचं ठरवलं. या व्यक्तीने स्वतःच्या अनैतिक प्रेमसंबंधातील अडथळा दूर करण्यासाठी पत्नीची हत्या करण्याचा बेत रचला. तो यशस्वी झालाही. मात्र, मुलाने स्वतः आईला शोधायला सुरुवात केल्यामुळे पित्याचं खरं रुप उघडं पडलं.
दिल्लीत राहणारे अशोक वाल्मिकी आणि त्याची पत्नी मिनाक्षी वाल्मिकी प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी घरातून निघाले होते. मात्र, मीनाक्षी यांना पती अशोक याच्या भयंकर हेतूची कल्पना सुद्धा नव्हती. दोघा पती-पत्नींनी प्रयागराजला पोहोचल्यावर त्रिवेणी संगमात फोटो काढून सोशल मीडियावर अपलोडही केले. त्यानंतर हे जोडपे एका लॉजमध्ये गेले आणि अशोकने पत्नीला आश्वासन दिले की, दुसऱ्या दिवशी ते दोघे पवित्र स्नान करण्यासाठी जातील.
हेही वाचा - Bengaluru: कुंपणानेच शेत खाल्लं तर..? 17वर्षीय बलात्कार पीडिता तक्रार नोंदवायला गेली.. पण पोलिसानेच पुन्हा केला बलात्कार
अशोकच्या डोक्यात शिजत होता पत्नीला संपवण्याचा कट
पण पती अशोक याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच शिजत होतं. तिथली गर्दीची परिस्थिती लक्षात घेता अशोक याने या गर्दीचा गुन्हा करण्यासाठी वापर करून घेतला. प्रयागराज येथील एका हॉटेलमध्ये पत्नीची हत्या करून ती महाकुंभमेळ्यात हरवली असल्याचा बनाव त्याने रचला. पण मुलाने यावर विश्वास न ठेवता आईच्या शोधाची मोहीम सुरू केल्याने त्याला त्याच्या पित्याचं कृत्य समजलं.
दिल्लीत राहणारे अशोक वाल्मिकी आणि त्याची पत्नी मिनाक्षी वाल्मिकी प्रयागराज यांनी त्रिवेणी संगमात फोटो काढून सोशल मीडियावर अपलोडही केले. त्यानंतर हे जोडपे एका लॉजमध्ये गेले. पती अशोक याने पत्नीला आश्वासन दिले की, दुसऱ्या दिवशी ते दोघे पवित्र स्नान करण्यासाठी जातील. पण दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडण्याआधीच अशोकने मिनाक्षीची हत्या केली. वॉशरुममध्ये धारदार शस्त्राने पत्नीची हत्या करून तो खोलीतून निघून गेला. त्यानंतर त्याने मुलाला फोन करून सांगितलं की, त्याची आई महाकुंभमेळ्यातील गर्दीत हरवली.
मृतदेह सापडला, पण ओळख पटवायची कशी?
दरम्यान, पोलिसांना लॉजमध्ये या महिलेचा मृतदेह सापडला. या मृतदेहाचा छडा लावण्याकरता पोलिसांसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. कारण, या लॉज मालकाने या जोडप्याकडून कोणतंही ओळखपत्र घेतलं नव्हतं. तसंच, अवघ्या 500 रुपयांत या लॉजमधील रुम देऊ केली होती. ओळखपत्राशिवाय आरोपीपर्यंत पोहोचणं पोलिसांसमोर आव्हान होतं.
पोलीस खुन्यापर्यंत कसे पोहोचले?
दुसरीकडे आईच्या शोधासाठी तिचा मुलगा प्रयागराजच्या दिशेने निघाला. महाकुंभमेळ्यात आल्यानंतर त्याने तिथे आईची शोधाशोध केली. हरवलेल्या आईला शोधण्यासाठी त्याने पोलिसांची मदत घेतली. पोलिसांना आईचा फोटो दाखवल्यानंतर त्यांनी या मुलाला प्रयागराजमधील शवागरात नेले. तिथे त्याने त्याच्या आईचा मृतदेह ओळखला. याच काळात पोलिसांनी त्याला त्याच्या वडिलांना फोन करायला लावला. त्यानुसार परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी आरोपी अशोक वाल्मिकीला शोधून काढले.
हेही वाचा - CIBIL Scoreचा वापर करून गाड्या चोरण्याची भन्नाट शक्कल, कारची शोरूममधून खरेदी आणि काळ्या बाजारात विक्री..
अशोकने पत्नीची हत्या का केली?
अशोकचे बाहेर प्रेमसंबंध होते. यावरून या दोघांमध्ये सातत्याने खटके उडत होते. यामुळे अशोक कंटाळला होता. म्हणून त्याने पत्नीचा काटा काढला, असा जबाब त्याने पोलिसांना दिला. या गुन्ह्यात अडकू नये म्हणून त्याने मुद्दाम ओळखपत्र विचारणार नाहीत, असा लॉज शोधून काढला होता.