World Rowing Cup: स्वित्झर्लंडमधील ल्युसर्न येथे आयोजित ‘वर्ल्ड रोइंग कप 3’ या स्पर्धेत भारताने सुवर्ण अक्षरांनी इतिहास रचला आहे. भारतीय लष्कराचे पराक्रमी जवान लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग यांनी या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशासाठी पहिलेवहिले सुवर्णपदक जिंकण्याचा बहुमान मिळवला आहे. ‘लाइटवेट मेन्स डबल स्कल्स’ प्रकाराच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अंतिम फेरीत भारतीय जोडीने उत्कृष्ट कौशल्य दाखवत 6 मिनिटे 26.09 सेकंदांची वेळ नोंदवून अव्वल स्थान पटकावले. अंतिम फेरीत हाँगकाँग आणि नेदरलँड्सच्या तगड्या आव्हानावर मात करत भारतीय जवानांनी सुरुवातीपासून घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवून ठेवली.
रोइंगच्या जागतिक मंचावर तिरंगा फडकला; लष्कराच्या खेळाडूंचा दबदबा
‘वर्ल्ड रोइंग कप’च्या प्रदीर्घ इतिहासात सुवर्णपदक जिंकणारी लक्ष्य आणि उज्ज्वल कुमार सिंग ही पहिलीच भारतीय जोडी ठरली आहे. या शर्यतीत हाँगकाँगच्या सॅन तुंग लॅम आणि टिक लुन चॅन या जोडीने 6:27.14 मिनिटांच्या वेळेसह रौप्यपदक, तर नेदरलँड्सच्या एरिक व्हॅन आयक व्हॅन हेसलिंगा आणि फ्रेडरिक प्लोग या जोडीने 6:27.36 मिनिटांत शर्यत पूर्ण करून कांस्यपदक मिळवले. उल्लेखनीय म्हणजे, या स्पर्धेत उतरलेल्या 18 सदस्यीय भारतीय संघात लष्कराचे प्रचंड वर्चस्व पाहायला मिळाले, कारण यातील 17 खेळाडू भारतीय लष्कराचे आणि 1 खेळाडू भारतीय नौदलाचा होता. ही ऐतिहासिक स्पर्धा ल्युसर्नमधील जगप्रसिद्ध ‘रोटसी’ (Rotsee) तलावावर पार पडली, जो आपल्या शांत पाण्यासाठी आणि 2000-मीटरच्या ऑलिम्पिक दर्जाच्या मार्गासाठी ओळखला जातो.
Historic! India's?? First Ever ?.
Hav Lakshay & Hav Ujjwal Kumar Singh (Army Rowing Node) won India’s first-ever World Rowing Cup gold in LM2x at Lucerne — 6:26.09. Proud moment for the Indian Army and the nation!
#IndianArmy#MissionOlympicsWing #ArmyRowingNode… pic.twitter.com/b67DAHaJGG — Indian Army Sports and Adventure (@IA_SportsAdvntr) June 28, 2026
तीन कांस्यपदकांनंतर भारताची सुवर्ण भरारी; आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मोठे पाऊल
यापूर्वी भारताला ‘वर्ल्ड रोइंग कप’मध्ये कधीही सुवर्णपदक जिंकता आले नव्हते. भारताने याआधी या मालिकेत केवळ 3 कांस्यपदके जिंकली होती, ज्याची सुरुवात 2009 मध्ये महिला गटातून झाली होती. त्यानंतर 2019 आणि 2022 मध्ये ‘पॅरा-डबल्स’ प्रकारात भारताने कांस्यपदके मिळवली होती. यंदा 26 ते 28 जून दरम्यान रंगलेल्या या स्पर्धेत जगभरातील 42 देशांतील 650 हून अधिक सर्वोत्तम खेळाडूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील सुवर्ण यशामुळे या वर्षाच्या उत्तरार्धात होणाऱ्या ‘वर्ल्ड रोइंग चॅम्पियनशिप्स’साठी भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे.