Monsoon Update 2026: देशभरातील अनेक राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या आठवड्यात ईशान्य भारतासह विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे आणि दक्षिण कर्नाटक या भागांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मान्सूनबाबतचे ताजे अपडेट काय आहे?
हवामान विभागाने मान्सूनबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट दिले आहे. विभागाने नमूद केले आहे की, शनिवारच्या (16 मे 2026) सुमारास नैऋत्य मान्सूनची दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. अनुकूल परिस्थितीमुळे समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग वाढल्याने मान्सून आपल्या नियोजित तारखेला किंवा त्यापूर्वीच पुढे सरकू शकतो.
उत्तर भारत आणि पर्वतीय राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामान विभागाने पंजाब, हरियाणा, चंदीगड, राजस्थान आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही आगामी दिवसांत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या कालावधीत वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो. तसेच, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गुरुवारी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि मुझफ्फराबाद या भागांसाठी 15-16 मे रोजी पावसाचा इशारा लागू असेल.
Rainfall Warning! Isolated heavy to very heavy rainfall also likely over northeast India during the week and over Tamil Nadu, Puducherry & Karaikal, Kerala & Mahe and South Interior Karnataka during next 4-5 days.#RainfallWarning #HeavyRain #NortheastIndia #TamilNadu #Kerala… pic.twitter.com/a593DnFZPK — India Meteorological Department (@Indiametdept) May 14, 2026
अनेक राज्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा तडाखा कायम
एककीडे पावसाचे संकेत मिळत असतानाच, उत्तर आणि मध्य भारतासह देशभरातील अनेक राज्ये अजूनही तीव्र उष्णतेच्या लाटेच्या (Heat Wave) विळख्यात आहेत. हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, वायव्य आणि मध्य भारतामध्ये हा उष्मा कायम राहील. या आठवड्यातील काही दिवस उष्णतेच्या लाटेची स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, दक्षिण भारतात पावसाचे आगमन होत असताना उत्तर भारतात मात्र उष्णतेची लाट कायम आहे. अंदमानच्या दिशेने मान्सूनची हालचाल सुरू झाल्याने लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.