नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आवाज उठवणारे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) चे संस्थापक अभिजीत दीपके अखेर भारतात दाखल झाले आहेत. अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांनी दिल्ली विमानतळावर पाऊल ठेवताच समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. विशेष म्हणजे, विमानतळाबाहेर येताना त्यांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुस्तक होते, ज्याची सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दिल्लीतील जंतरमंतर येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनासाठी अभिजीत दीपके स्वतः उपस्थित राहणार असल्याने त्यांच्या आगमनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणात तरुण, समर्थक आणि माध्यम प्रतिनिधी उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळाले. दीपके यांचे आगमन होताच घोषणाबाजी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
‘कॉकरोच जनता पार्टी’ने शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर आंदोलनाची भूमिका घेतली आहे. विशेषतः नीट परीक्षा आणि इतर प्रवेश व भरती प्रक्रियांमधील कथित अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन होत आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी हे या आंदोलनाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जंतरमंतर येथे आंदोलनासाठी दिल्ली पोलिसांनी मर्यादित वेळेसाठी परवानगी दिली आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलन करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे. आंदोलन शांततेत पार पडावे यासाठी प्रशासनाने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. दिल्ली पोलीस, निमलष्करी दल आणि इतर सुरक्षा यंत्रणांचे सुमारे हजार कर्मचारी या संपूर्ण कार्यक्रमावर लक्ष ठेवून आहेत.
अभिजीत दीपके यांच्या आंदोलनाला सोशल मीडियावर मोठा प्रतिसाद मिळत असल्याने सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाल्या आहेत. विमानतळापासून जंतरमंतरकडे जाणाऱ्या मार्गांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली आहे.
याचदरम्यान, अभिजीत दीपके यांना काही दिवसांपूर्वी धमकीचे संदेश आल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेचा मुद्दाही चर्चेत आला. छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या निवासस्थानावर अद्याप पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संभाव्य सुरक्षेच्या कारणास्तव दीपके यांच्या आई-वडिलांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून ते सध्या मूळ घरी राहत नाहीत.
दिल्लीतील आजचे आंदोलन केवळ एका संघटनेचा कार्यक्रम नसून देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचा दावा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे जंतरमंतरवरील या आंदोलनाकडे राजकीय वर्तुळासह देशभरातील तरुणांचेही लक्ष लागले आहे.
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन पुढे कोणते वळण घेते आणि सरकार त्यावर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.