Love Tragedy: एका विवाहित पुरुषाने आणि त्याच्या जुन्या प्रेयसीने धावत्या वंदे भारत एक्सप्रेससमोर उडी मारून आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडली आहे. आलम नगर स्थानकाजवळील जलालपूर रेल्वे क्रॉसिंगवर शनिवारी 10 जानेवारी रोजी ही घटना उघडकीस आली. सूर्यकांत (35) आणि दीपाली (25) अशी मृतांची नावे असून, त्यांच्या या टोकाच्या कृत्यामागे गुंतागुंतीचे प्रेमप्रकरण असल्याचे समोर आले आहे.
डोळ्यादेखत देह रेल्वेखाली झोकला
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही रेल्वे रुळाजवळ उभे होते. भरधाव वेगाने येणारी वंदे भारत एक्सप्रेस पाहताच त्यांनी अचानक रुळावर उडी मारली. उपस्थित नागरिकांनी त्यांना ओरडून थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र या जोडप्याने कोणाचेही ऐकले नाही. रेल्वेच्या धडकेने दोघांच्याही शरीराच्या चिंधड्या उडाल्या.
काय आहे नेमकं प्रकरण?
पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात या प्रेमाचा धक्कादायक इतिहास उघड झाला आहे. सूर्यकांत हा विवाहित होता आणि त्याला 10 वर्षांचा संसार व एक मुलगाही आहे. दीपालीसोबत त्याचे लग्नापूर्वी 3 वर्षे प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही सूर्यकांत आणि दीपालीचे एकमेकांशी संबंध कायम होते. दोघेही एकाच खासगी कंपनीत कामाला होते. कुटुंबाला कोणतीही कल्पना न देता हे दोघे गेल्या तीन दिवसांपासून भाड्याचे घर घेऊन एकत्र राहत होते. त्यांच्या कुटुंबाने ते हरवल्याची तक्रारही पोलिसांत दिली होती.
घटनास्थळी मिळाल्या दोन बॅगा
पोलिसांना घटनास्थळावरून कपड्यांनी भरलेल्या दोन मोठ्या बॅगा, तीन मोबाईल फोन आणि आधार कार्ड सापडले आहे. बॅगेतील कपड्यांवरून हे जोडपे शहराबाहेर पळून जाण्याच्या तयारीत असावे, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, शेवटच्या क्षणी त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले, याचा तपास आता पोलीस करत आहेत.