QR Code Technology: महिला आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तंत्रज्ञानाचा एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. आंध्र प्रदेशातील मोहन बाबू विद्यापीठाचा विद्यार्थी जी. श्रीनिवास रेड्डी याने एक असा नाविन्यपूर्ण QR कोड विकसित केला आहे, जो संकटाच्या वेळी प्रवाशाचे 'लाईव्ह लोकेशन' थेट पोलिसांपर्यंत पोहोचवतो. ऑटो-रिक्षा किंवा टॅक्सीमधून प्रवास करताना असुरक्षित वाटल्यास, केवळ हा कोड स्कॅन केल्यावर पोलिसांचे नियंत्रण कक्ष आणि जवळचे गस्त पथक (Patrol Unit) सतर्क होणार आहेत. आयपीएस अधिकारी एस.व्ही. राजशेखर बाबू यांच्या हस्ते या उपक्रमाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले असून, शैक्षणिक ज्ञानाचा वापर सामाजिक समस्या सोडवण्यासाठी केल्याबद्दल श्रीनिवासचे कौतुक होत आहे.
कसे काम करते हे तंत्रज्ञान?
हे विशेष तंत्रज्ञान प्रवाशांना संकटाच्या क्षणी त्वरित मदत मिळवून देण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. हा QR कोड वाहनामध्ये चालकाच्या सीटच्या मागील बाजूस लावलेला असेल. जेव्हा एखादा प्रवासी हा कोड स्कॅन करेल, तेव्हा त्याचे सद्यस्थितीचे स्थान (Live Location) पोलिसांशी सामायिक केले जाईल. यामुळे पोलिसांना संबंधित वाहनाचा मागोवा घेणे सोपे होणार आहे. विशेष म्हणजे, या संशोधनासाठी श्रीनिवासला डीसीपी शेख शरीना बेगम यांसारख्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
फीडबॅक आणि रेटिंगची अतिरिक्त सुविधा
केवळ लोकेशन शेअरिंगच नव्हे, तर या प्रणालीमध्ये प्रवाशांना आपला अनुभव नोंदवण्यासाठी 'फीडबॅक आणि रेटिंग'ची सुविधाही देण्यात आली आहे. प्रवाशांनी दिलेल्या रेटिंगच्या आधारे पोलीस आता चालकांवर लक्ष ठेवू शकणार आहेत. ज्या चालकांना सातत्याने कमी मानांकन मिळेल, त्यांच्यावर पोलिसांची कडक पाळत असेल. या प्रणालीमुळे महिलांच्या सुरक्षिततेत मोठी भर पडणार असून, स्थानिक वाहतूक व्यवस्थेवर प्रवाशांचा विश्वास अधिक वृद्धिंगत होण्यास मदत होईल.