पंजाब राज्यातील पटियाला जिल्ह्यातील राजपुरा आणि शंभू रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या (DFCCI) रेल्वे मार्गावर उशिरा रात्री जोरदार स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. या स्फोटाचा आवाज दूरवरपर्यंत ऐकू गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल, जीआरपी आणि स्थानिक पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. सध्या कोणतीही जीवित किंवा मालमत्तेची हानी झाल्याची नोंद नाही, मात्र या स्फोटामागे मोठा कट असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रेल्वे ट्रॅकवर झालेल्या या स्फोटाकडे संशयाच्या दृष्टीने पाहिले जात असून, ही एखाद्या दहशतवादी कारवाईची किंवा रेल्वे मार्गाचे नुकसान करण्याच्या प्रयत्नाची घटना असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. गुप्तचर यंत्रणांना सतर्क करण्यात आले असून, सखोल चौकशी सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी परिसर तातडीने घेरला असून नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले आहे. एसपी डीके चौधरी यांनी सांगितले की, संबंधित वस्तू खरोखर स्फोटक आहे की नाही याची तपासणी सुरू आहे. स्थानिक नागरिकांची चौकशी करण्यात येत असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.
याआधीही याच वर्षी फतेहगढ साहिब जिल्ह्यातील सरहिंद परिसरात मालगाडी मार्गावर मोठा स्फोट झाला होता. त्या घटनेत रेल्वे ट्रॅकचा सुमारे 15 फूट भाग उडाला होता आणि तेथून जाणाऱ्या मालगाडीच्या इंजिनालाही नुकसान झाले होते. या स्फोटात लोको पायलट जखमी झाला होता. या पार्श्वभूमीवर सध्याच्या घटनेकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात असून, सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे.