लोकसभेचे माजी सभापती आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ शिवसेना नेता मनोहर जोशी यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. माहीम येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. जोशी यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु असल्याचे सांगितले जात आहे. लवकर हिंदुजा रुग्णालयाकडुन याबाबतची अधिकृत माहिती दिली जाणार आहे.
सोमवारी रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉ चारुलता संकला यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. मनोहर जोशी यांना रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे जोशी यांची विचारपूस करण्यासाठी पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह हिंदुजा रुग्णालयात गेले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस आणि माहिती घेण्यासाठी हिंदुजा रुग्णालयात दाखल होणार आहे.
शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येऊन त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. १९७६ ते १९७७ या काळात ते मुंबईचे महापौर होते. राज्याच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष भाजप युतीने काँग्रेसचा पराभव केल्यावर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुंबई सेंट्रलमधून विजयी झाल्यावर त्यांना लोकसभेत बढती मिळाली. जोशी यांनी केंद्रात मंत्रिपदही भूषवलं असून ते एकदा लोकसभेचे अध्यक्षही राहिलेले आहे. त्यामुळं आता त्यांची प्रकृती बिघडल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.