२०१४च्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील मालमत्तेची माहिती लपवल्याप्रकरणी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अमरावतीच्या चांदूरबाजार न्यायालयाने बच्चू कडूंना शिक्षा सुनावली आहे. तसेच शिक्षेसोबत बच्चू कडूंना न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.
बच्चू कडू म्हणाले, मुंबईत घर घेण्यासाठी कर्ज काढले होते. कर्जाची रक्कम निवडणूक आयोगाला कळवली होती. फक्त घराचा क्रमांक कळवला नव्हता. मात्र, मुंबईत कर्जाचे घर असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. ही चूक जाणीवपूर्वक केली नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय चूकीचा असला तरीही न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. माझ्या विरोधात सूड भावनेने तक्रार दाखल करण्यात आली असून याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचे, बच्चू कडू यांनी सांगितले आहे.
२०१४च्या विधानसभा निवडणूकीत बच्चू कडू अचलपूर मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र, या निवडणुकीसाठीच्या उमेदवाराच्या शपथपत्रात त्यांनी मुंबईतील मालमत्तेची माहिती दिली नाही. याप्रकरणी चांदूरबाजारचे भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी आरोप करत २०१७मध्ये तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर चार वर्षांनी या प्रकरणाचा निकाल अमरावतीच्या चांदूरबाजार न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे. लोकप्रतिनिधी कायद्यान्वये बच्चू कडू यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाला असून त्यांच्यावर कारवाईचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.