हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये न झाल्यामुळे यंदाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्याची मागणी भाजपने केली होती. मात्र, अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत व्हावे तसेच १५ फेब्रुवारी रोजी सल्लागार समितीची बैठक पार पडणार असून या बैठकीमध्ये यावर चर्चा केली जाणार असल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपुरात घेण्यासाठी राज्यपालांचे अभिभाषण घेण्यासाठी नागपुरात सभागृह नाही. तसेच नागपुरातील आमदार निवास विलगीकरण कक्ष म्हणून वापरले जात आहेत. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत व्हावे असे नवाब मलिक म्हणाले आहेत.
महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत होण्याची शक्यता आहे. नागपूर अधिवेशनाचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी घेणार असून महाविकास आघाडी सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थानबदलाचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले.
नागपूर करारानुसार विधिमंडळ अधिवेशनाचे एक सत्र उप राजधानीत होणे बंधनकारक आहे. तर दरवर्षी हिवाळी अधिवेशन नागपुरात होत आले आहे. २०२१साली हिवाळी अधिवेशन नागपुरात झाले नाही. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीसाठी २०२१चे हिवाळी अधिवेशन मुंबईतच झाले. दरम्यान, २०२१मध्ये नागपुरमध्ये एकही अधिवेशन झाले नाही. भाजपाने नागपूर कराराची आठवण करून दिली आहे. त्यामुळे अर्थसंकल्प अधिवेशन नागपुरला घेण्याची मागणी जोर धरत होती. तसेच मविआनेसुद्धा अर्थसंक्लपीय अधिवेशन नागपुरात घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, नागपूर विधिमंडळात संयुक्त सभागृह आणि राज्यपाल अभिभाषणाची सोय अशक्य असल्याने अर्थसंकल्पाविषयी नवा प्रस्ताव समोर आला आहे. दरम्यान, १५ फेब्रुवारी रोजी सल्लागार समितीची बैठक होणार असून यावर निर्णय होणार असल्याची माहिती अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.