Ankita Walawalkar: सध्या बॉक्स ऑफिसपासून सोशल मीडियापर्यंत एकाच चित्रपटाची चर्चा आहे, ती म्हणजे धुरंधर. भारत–पाकिस्तान संघर्षाची पार्श्वभूमी, हेरगिरीचं थरारक विश्व आणि दमदार अभिनय यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. कमाईचे नवनवे विक्रम करत असतानाच धुरंधरभोवती सोशल मीडियावर अनेक ट्रेंडही सुरू झाले आहेत. मात्र याच ट्रेंडवरून आता एक वेगळीच चर्चा रंगली असून, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अर्थात अंकिता वालावलकर हिनं यावर ठामपणे आपलं मत मांडलं आहे.
दिग्दर्शक आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला धुरंधर हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता देशभक्ती, गुप्तचर यंत्रणांचं काम आणि राष्ट्रासाठी दिल्या जाणाऱ्या बलिदानाकडेही लक्ष वेधतो. रणवीर सिंहच्या मुख्य भूमिकेसोबतच अक्षय खन्नाने साकारलेला ‘रहमान डकैत’ हा डॉन प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिला आहे. अक्षय खन्नाची एक डान्स स्टेप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून, त्यावर रिल्सचा पूर आला आहे.
हेही वाचा: Oscar 2026 Homebound : 2026 च्या ऑस्करसाठी भारताकडून 'होमबाऊंड'ची निवड
याचदरम्यान ‘Day 1 As a Spy in Pakistan’ हा ट्रेंड इन्स्टाग्रामवर जोरात सुरू झाला. अनेक कंटेंट क्रिएटर्स या ट्रेंडचा वापर करत मजेशीर, हलक्याफुलक्या रिल्स बनवत आहेत. मात्र यावर अंकिता वालावलकर हिनं थेट आणि स्पष्ट भूमिका घेतली. “स्पायचं काम इतकं सोपं असतं का, की त्यावर आपण जोक्स आणि रिल्स बनवू?” असा सवाल तिनं उपस्थित केला.
अंकिताच्या मते, गुप्तहेर वेगळ्या देशात, वेगळ्या ओळखीखाली जगत असतात. सतत जीवावर बेतू शकणाऱ्या परिस्थितीत राहून ते देशसेवा करत असतात. कुटुंबापासून लांब, कोणताही फेम किंवा क्रेडिट न मिळता काम करणं ही सोपी गोष्ट नाही. “जशी आपल्याला आपली आर्मी प्रिय आहे, तसंच हे स्पायही देशासाठी तितकंच महत्त्वाचं काम करत असतात,” असं ती व्हिडीओमध्ये म्हणते.
तिनं केवळ टीका न करता प्रेक्षकांना आणि कंटेंट क्रिएटर्सना विचार करायलाही भाग पाडलं. “थोडंसं वाचा. रविंद्र कौशिक उर्फ ब्लॅक टायगर यांच्याबद्दल वाचा. आजचं जग फेम आणि व्ह्यूजवर चालतं, पण या लोकांना काहीच मिळत नाही,” असं सांगत ट्रेंडसाठी काहीही बनवण्याआधी विचार करण्याचं आवाहन अंकितानं केलं.
दरम्यान, धुरंधरचा दुसरा भाग येणार असल्याचं संकेत मिळाले असून, पहिल्या भागानेच प्रेक्षकांना वेड लावलं आहे. सोशल मीडियावर प्रेक्षकच समीक्षक बनून चित्रपटाच्या बाजूने ठामपणे उभे राहताना दिसत आहेत. अशातच अंकिताच्या या स्पष्ट आणि संवेदनशील भूमिकेमुळे तिचं सर्वत्र कौतुक होत असून, “कोणीतरी तरी हे बोलणं गरजेचं होतं,” असंच अनेकजण म्हणताना दिसत आहेत.