मुंबई : साऊथचा सुपरस्टार आणि ‘पुष्पा 2’ चित्रपटातील नायक अल्लू अर्जुन याची अखेर आज सकाळी तुरुंगातून सुटका झाली. तेलंगणा हायकोर्टाने त्याला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हैदराबादमधील संध्या थिएटरमध्ये ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अल्लू अर्जुन याला अटक करण्यात आली होती.
नेमकं काय घडलं?
4 डिसेंबर रोजी ‘पुष्पा 2’ हा चित्रपट रिलीज झाला. चित्रपट पाहण्यासाठी हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. चित्रपटाच्या स्क्रिनिंगदरम्यान अल्लू अर्जुन थिएटरमध्ये येणार असल्याची चर्चा पसरल्यानंतर चाहत्यांची संख्या अधिकच वाढली. मात्र, थिएटर व्यवस्थापनाने गर्दी नियंत्रणासाठी कोणतीही विशेष व्यवस्था केलेली नव्हती.
रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास अल्लू अर्जुन थिएटरमध्ये पोहोचला. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी गर्दी आत येऊ लागली. यावेळी अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाने चाहत्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली. मोठ्या चेंगराचेंगरीत रेवती नावाच्या महिलेचा घुसमटून मृत्यू झाला, तर तिचा मुलगा गंभीर जखमी झाला.घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तत्काळ रेवती आणि तिच्या मुलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मुलाला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र रेवती यांना वाचवता आलं नाही. पोलिसांनी या प्रकरणी थिएटर व्यवस्थापक, अल्लू अर्जुन आणि त्याच्या सुरक्षा पथकावर गुन्हा दाखल केला.
अल्लू अर्जुनची अटक आणि जामीन प्रक्रिया
चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाल्याने अल्लू अर्जुनला काल दुपारी अटक करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, तेलंगणा हायकोर्टाने यावर हस्तक्षेप करत त्याला 4 आठवड्यांचा अंतरिम जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर झाल्यानंतरही कारागृह प्रशासनाला कागदपत्रे उशिरा मिळाल्याने अल्लू अर्जुनला कालची रात्र चंचलगुडा तुरुंगातच काढावी लागली. अखेर आज सकाळी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली.