Akshaye Khanna on Dhurandhar : सगळा भारत अक्षय खन्नाच्या प्रेमात पण त्याचं काहीतरी वेगळंच, म्हणाला, ‘फरक पडत नाही…’

सोशल मीडियावरील प्रचंड चर्चेसह चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही विक्रम प्रस्थापित केले असून, अक्षय खन्नाचे शांत व्यक्तिमत्त्व पुन्हा चर्चेत आले आहे.

Akshaye Khanna on Dhurandhar : सगळा भारत अक्षय खन्नाच्या प्रेमात पण त्याचं काहीतरी वेगळंच, म्हणाला, ‘फरक पडत नाही…’

सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा रंगलेली दिसतेय, ती म्हणजे ‘धुरंधर’ चित्रपटाची, त्यातील अक्षय खन्नाच्या दमदार अभिनयाची आणि विशेषतः त्याने साकारलेल्या गँगस्टर रहमान डकैत या भूमिकेची. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून अक्षय खन्नाच्या अभिनयावर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव होत असून, चाहत्यांपासून सिनेसृष्टीपर्यंत सर्वत्र त्याच्याच भूमिकेची चर्चा आहे.

‘धुरंधर’मधील रहमान डकैतचा अवतार इतका प्रभावी ठरला की अनेक प्रेक्षकांच्या मते अक्षय खन्नाने चित्रपटातील इतर प्रमुख कलाकारांवरही छाप सोडली आहे. सोशल मीडियावर त्याच्या एंट्री सीनपासून संवादफेकीपर्यंत अनेक क्लिप्स व्हायरल होत आहेत. चित्रपटातील एका गाण्यातील त्याच्या डान्स स्टेप्सनाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, अक्षय खन्ना पुन्हा एकदा का खास अभिनेता आहे, हे त्यातून अधोरेखित झालं आहे.

या भूमिकेसाठी अक्षय खन्नाची निवड प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांनी केली होती. आता चित्रपटाच्या यशानंतर मुकेश छाब्रांनी दिलेल्या मुलाखतीत अक्षयच्या अभिनयाचं मनापासून कौतुक केलं आहे. त्यांच्या मते, अक्षय खन्ना हा असा अभिनेता आहे की, त्याची अभिनयशैली पूर्णपणे वेगळी आणि स्वतःची आहे. तो कुणाची नक्कल करत नाही, तर प्रत्येक भूमिकेत स्वतःचा खास ठसा उमटवतो, आणि तो इतक्या सहजतेने करतो की प्रेक्षक त्याच्यावर प्रेम करायला भाग पडतात.

हेही वाचा: Richard Mille Luxury Watches: श्रीमंतांचा थाटच न्यारा! लिओनेल मेस्सीला मिळालं कोट्यवधी रूपयांचं घड्याळ, किंमत तब्बल…

मुकेश छाब्रांनी आणखी एक रंजक बाबही उघड केली. त्यांनी सांगितलं की, चित्रपटाच्या प्रचंड यशाबद्दल बोलताना अक्षय खन्ना फारसा उत्साही किंवा भारावलेला नव्हता. उलट, सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांबद्दल त्याला फारशी कल्पनाच नव्हती.  "मला या गोष्टींचा फरक पडत नाही असं अक्षय म्हणाला. त्याला फक्त एवढंच वाटत होतं की सिनेमात काम करताना मजा आली,” असं मुकेश छाब्रांनी सांगितलं. अक्षय आपल्या कामावर प्रचंड प्रेम करतो, पण यशाचा गाजावाजा त्याच्यासाठी दुय्यम असतो, असंही त्यांनी नमूद केलं. सेटवर अक्षय खन्नाची काम करण्याची पद्धत अत्यंत शिस्तबद्ध असल्याचंही छाब्रांनी सांगितलं. तो स्वतःच्या स्पेसमध्ये राहून, प्रत्येक सीन बारकाईने वाचतो, तयारी करूनच कॅमेऱ्यासमोर उभा राहतो. हीच मेहनत आणि शांत आत्मविश्वास नंतर त्याच्या अभिनयात दिसून येतो, आणि त्यामुळेच त्याची प्रत्येक भूमिका लक्षात राहते.

दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित हा स्पाय अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवरही विक्रम मोडत आहे. ‘धुरंधर’ने प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातच नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले असून, अवघ्या 12 दिवसांत तो 2025 मधील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. आतापर्यंत जगभरात सुमारे 634 कोटी रुपयांची कमाई करत या चित्रपटाने अनेक मोठ्या सिनेमांना मागे टाकलं आहे.

सर्वत्र मिळणाऱ्या या यशाच्या आणि कौतुकाच्या झोतातही अक्षय खन्ना मात्र आपल्या खास शांत स्वभावातच आहे. अलीकडेच त्याने अलिबाग येथील आपल्या घरी वास्तुशांती हवन केल्याचं समोर आलं असून, प्रसिद्धीपेक्षा वैयक्तिक समाधान आणि कामावरील निष्ठा हाच त्याचा खरा फोकस असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

हेही वाचा: Sanjay Raut: माणिकराव कोकाटे ही हिट विकेट, स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी अजित पवार… संजय राऊतांचा थेट आरोप

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number