मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर म्हणून मानले जाते, मात्र सुरक्षित शहर म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मुंबईत एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत धक्कादायक घटना घडली आहे. रिअॅलिटी शो ‘स्प्लिट्सविला सीझन 16’ची स्पर्धक प्रीत सिंग हिच्या सोबत मुंबईत एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. अभिनेत्री प्रीत सिंहने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिची अवस्था न पाहण्यासारखी आहे. अभिनेत्री प्रीत सिंहला रात्रीच्या सुमारास एका व्यक्तीने गंभीररित्या मारहाण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ती एका क्लबमध्ये गेलेली असताना तिला तिथे बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तिच्या चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. ज्यात तिचे दात तुटले, संपूर्ण चेहरा आणि डोळे गंभीररित्या सुजल्याचं पाहायला मिळतो आहे.
यावेळेस तिने स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, “मी नेहमीच ऐकलं होतं की मुंबई मुलींसाठी सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक आहे, पण ते माझं असं स्वागत करेल याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. हे लिहित असतानाही, मी थरथरत आहे, माझे डोळे सुजले आहेत, माझ्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत आणि जे घडलं ते मी अजूनही पचवण्याचा प्रयत्न करत आहे. मी माझ्या मैत्रिणीसोबत एका क्लबमध्ये आरामात बसून मजा करत होते, तेव्हा एक मुलगी अचानक ओरडायला लागली आणि आम्हाला आत येऊच कसं दिलं, असा प्रश्न विचारू लागली. जे एका शाब्दिक वादाने सुरू झालं होतं, ते तिच्या पुरुष मित्राने मध्ये येऊन आमच्यावर शारीरिक हल्ला केल्यावर एका भयानक घटनेत बदललं. मला इतका मार लागला की माझा दात तुटला आणि माझा चेहरा सुजला. लोकांनी हस्तक्षेप केल्यावरच परिस्थिती थांबली. नंतर मला कळलं की ती मुलगी एक तथाकथित इन्फ्लुएन्सर आहे. असं काही इतक्या उघडपणे घडू शकतं या विचाराने मी अजूनही हादरले आहे. कोणासोबतही असं व्हायला नको.”
तिने व्हिडीओ शेअर करत तिची सद्यपरिस्थिती दाखवली. तिने पोस्ट लिहित संपूर्ण घटना सांगितलं. अभिनेत्री प्रीत सिंह हिला स्प्लिट्सविला 16 मधून लोकप्रियता मिळाली होती. तसेच तिचे मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात देखील वर्चस्व आहे. सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहिल्यानंतर तिच्यासोबत घडलेल्या घटनेवर अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.