गुवाहाटी : आसामचे प्रसिद्ध गायक जुबिन गार्ग यांच्या मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड झाली आहे. गायकाचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा आणि नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक श्यामकानू महंता यांना पोलिसांनी अटक केली आहे. जुबिन यांचा मृत्यू 19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये समुद्रात बुडाल्याने झाला होता.
माहितीनुसार, श्यामकानू महंता यांना सिंगापूरहून परत आल्यानंतर नवी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. तर गायकाचे मॅनेजर सिद्धार्थ शर्मा यांना गुरुग्राममधील एका अपार्टमेंटमधून ताब्यात घेण्यात आलं. दोघांनाही बुधवारी पहाटे गुवाहाटीला आणण्यात आलं असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आसाम सरकारने विशेष तपास पथक SIT स्थापन केलं आहे. विशेष पोलीस महासंचालक एम. पी. गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील या पथकात दहा सदस्यांचा समावेश आहे. SIT ने याआधीच महंता, शर्मा, तसेच सिंगापूर आसाम असोसिएशन चे सदस्य आणि कार्यक्रमाला गेलेल्या इतर लोकांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते.
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी काही दिवसांपूर्वीच सांगितले होते की, या दोघांवर इंटरपोलमार्फत लुकआऊट नोटिस जारी करण्यात आली आहे. त्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत CID समोर हजर राहण्याची सक्ती करण्यात आली होती. अखेर, पोलिसांनी दोघांना अटक करून गुवाहाटीला आणल्याने या प्रकरणातील तपासाला गती मिळाली आहे.
जुबिन गार्ग यांच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर ईशान्य भारतात शोककळा पसरली होती. त्यांच्या मृत्यूमागे नेमकं काय कारण होतं, याबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत. आता झालेल्या अटकेनंतर या गूढ प्रकरणातील सत्य समोर येण्याची अपेक्षा आहे.