शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत असताना आता समोर आलेली एक घटना सर्वांना हादरवून टाकणारी आहे. साधारणपणे महिलांवरील अत्याचारांच्या घटना नेहमीच चर्चेत असतात; मात्र यावेळी चित्र पलटले असून, एका महिलेनेच पुरुषावर अत्याचार केल्याची अभूतपूर्व घटना कोथरूड परिसरात उजेडात आली आहे. ‘विद्येचं माहेरघर’ म्हणून ओळखलं जाणारं पुणे, गेल्या काही दिवसांत विविध गुन्ह्यांमुळे चर्चेत आलं असतानाच या प्रकरणाने शहरातील नागरिकांना धक्का बसला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला त्या इसमाला जबरदस्तीने काशी विश्वनाथ मंदिर परिसरात घेऊन गेली. त्यानंतर तिने त्याला गुंगी आणणारे औषध दिले आणि त्याची प्रतिकारशक्ती कमी होताच त्याचा गैरवापर केला. इतक्यावर ती थांबली नाही, तर त्या स्थितीतच त्या व्यक्तीचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही महिला स्वतःला वकील असल्याचे सांगत पीडित व्यक्तीला घाबरवत होती.
या गंभीर प्रकारानंतर पीडित व्यक्तीने धैर्य एकवटत सरळ कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रार नोंदवून झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला असून आरोपी महिला गौरी वांजळे हिच्याविरुद्ध विविध कलमांनुसार कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीला सुरुवात केली असून गुन्हा घडण्याची पार्श्वभूमी, आरोपी महिला आणि पीडित व्यक्तीचे संबंध, तसेच पैशांची उकळणी करण्यासाठी वापरलेले कोणतेही जाळे आहे का याचा तपास सुरू आहे.
या घटनेने पुण्यात एक वेगळाच सामाजिक प्रश्न उभा केला आहे. अत्याचार हा स्त्री-पुरुष कोणावरही होऊ शकतो आणि त्यामागे अपराधी मानसिकताच कारणीभूत असते, याची जाणीव या प्रकरणातून पुन्हा एकदा झाली आहे. समाजात अत्याचारांच्या घटना वाढत असताना पीडित व्यक्तीने निर्भीडपणे तक्रार दाखल केल्याने अनेकांना धैर्य मिळेल, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.