Twisha Sharma Case: भोपाळमध्ये एका विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यूने देशभरात खळबळ उडाली आहे. नोएडा येथील ट्विशा शर्मा हिचा मृतदेह तिच्या सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्यानंतर या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे. सुरुवातीला आत्महत्येचा अंदाज व्यक्त करण्यात आला असला तरी, ट्विशाच्या कुटुंबीयांनी हुंड्यासाठी छळ, मानसिक अत्याचार आणि प्रभावशाली सासरकडून दबाव टाकल्याचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
डेटिंग ॲपवरून ओळख, त्यानंतर लग्न
ट्विशा शर्मा ही नोएडामध्ये राहणारी आणि मार्केटिंग क्षेत्रात काम करणारी तरुणी होती.2024 मध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून तिची ओळख भोपाळमधील वकील समर्थ सिंग याच्याशी झाली होती. या ओळखीचे पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले आणि डिसेंबर 2025 मध्ये दोघांनी विवाह केला. समर्थ सिंग हे निवृत्त सत्र न्यायाधीश गिरिबाला सिंग यांचे पुत्र असल्याने हे कुटुंब भोपाळमध्ये प्रभावशाली मानले जाते.
सासरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह
12 मे रोजी रात्री कातारा हिल्स परिसरातील घरात ट्विशा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. पती आणि सासू यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची माहिती रात्री उशिरा पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नाही.
पोलिसांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्विशा रात्रीपर्यंत कुटुंबाशी संपर्कात होती. काही वेळानंतर ती छताकडे जाताना दिसते आणि त्यानंतर इतर लोक तिला खाली आणताना फुटेजमध्ये दिसल्याचे समोर आले आहे.
कुटुंबीयांचे गंभीर आरोप
ट्विशाच्या कुटुंबीयांनी या मृत्यूमागे सासरच्यांचा छळ असल्याचा आरोप केला आहे. विवाहानंतर तिच्यावर सतत मानसिक दबाव टाकला जात होता, असा दावा त्यांनी केला आहे. हुंड्यासाठी त्रास, शारीरिक छळ आणि गर्भधारणेबाबत दबाव आणला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
कुटुंबीयांच्या मते, ट्विशा अनेकदा नोएडाला परत येण्याची इच्छा व्यक्त करत होती. मृत्यूपूर्वी तिने आईशी आणि काही जवळच्या मित्रमैत्रिणींशी संवाद साधून मानसिक त्रासाबद्दल सांगितले होते. यानंतर कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराला विरोध करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली.
थरारक व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम चॅट्स
या प्रकरणात ट्विषाचे काही कथित चॅट्स समोर आले असून त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. आईला पाठवलेल्या संदेशात तिने “मला खूप गुदमरल्यासारखं होतंय” असे लिहिले होते. तसेच तिच्यावर सतत संशय घेतला जात असल्याचेही तिने नमूद केले होते.
एका मैत्रिणीशी इंस्टाग्रामवर बोलताना ट्विशाने “मी अडकले आहे, जास्त बोलू शकत नाही” असा संदेश पाठवला होता. त्यानंतर तिच्याशी संपर्क होऊ शकला नाही आणि दुसऱ्याच दिवशी तिच्या मृत्यूची बातमी समोर आली.
हुंडाबळीचा गुन्हा, SIT कडून तपास
कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी पती समर्थ सिंग आणि सासू गिरिबाला सिंग यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सहा सदस्यीय विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे.
पोलिसांनी समर्थ सिंगच्या अटकेसाठी माहिती देणाऱ्यास 10 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तो सध्या फरार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे गिरिबाला सिंग यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.
प्रभावाचा वापर झाल्याचा आरोप
ट्विषाच्या वडिलांनी या प्रकरणात न्यायप्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आरोपी कुटुंबाचे न्यायव्यवस्थेशी संबंध असल्यामुळे तपास निष्पक्ष होईल का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास करण्याची मागणी केली आहे.
तसेच मृतदेहाचे दुसरे पोस्टमॉर्टम दिल्लीतील AIIMS रुग्णालयात करण्यात यावे, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे.
सासरच्यांचा बचाव
दरम्यान, सासरच्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. जामीन अर्जामध्ये ट्विषा मानसिक तणावाखाली होती आणि तिची प्रकृती अस्थिर होती, असा दावा करण्यात आला आहे. तसेच तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही समस्यांमुळे तिने टोकाचे पाऊल उचलल्याचेही म्हटले आहे.
ट्विशा शर्मा कोण होती?
ट्विशा शर्मा ही शिक्षित आणि करिअरकेंद्री तरुणी होती. तिने MBA शिक्षण पूर्ण केले होते आणि मार्केटिंग व कम्युनिकेशन क्षेत्रात काम करत होती. ती ब्युटी पेजंट्समध्ये सहभागी झाली होती. तसेच एका तेलुगू चित्रपटातही तिने भूमिका साकारली होती.
योग आणि विपश्यना ध्यानात तिची विशेष रुची होती. सोशल मीडियावर ती सक्रिय होती आणि सकारात्मक जीवनशैलीसाठी ओळखली जात होती. मात्र, तिच्या अचानक मृत्यूमुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.