तिरुपती : आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे एका निलंबित प्राध्यापकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. Sri Venkateswara University येथील प्राध्यापकाचा मृतदेह शुक्रवारी अलिपिरी परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून, या प्रकरणाभोवती गूढ निर्माण झाले आहे.
तिरुपती वेस्ट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख व्ही. सरदार गुग्लोथ अशी करण्यात आली आहे. ते विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कॉमर्स, मॅनेजमेंट अँड कॉम्प्युटर सायन्स येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सुमारे तीन महिन्यांपूर्वी मद्यसेवनाचे व्यसन आणि वर्गांमध्ये अनियमित उपस्थिती या कारणांमुळे त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईत निलंबित करण्यात आले होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून सरदार गुग्लोथ बेपत्ता असल्याची नोंद होती. शुक्रवारी अलिपिरी परिसरात उभ्या असलेल्या एका कारमधून दुर्गंधी येत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यांनी कारमध्ये डोकावून पाहिले असता, आत एका मध्यमवयीन व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आला. त्यानंतर तत्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पोहोचलेल्या तिरुपती वेस्ट पोलिसांनी कारची तपासणी केली आणि मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक पाहणीत मृतदेह अनेक दिवस जुना असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे मृत्यू नेमका कधी आणि कशामुळे झाला, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृत प्राध्यापकांची पत्नी मीना भाई या चित्तूर येथील सरकारी जिल्हा परिषद शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला 15 आणि 12 वर्षांच्या दोन मुली आहेत. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी (Postmortem) पाठवून गुन्हा नोंदवला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून, हा मृत्यू अपघाती आहे की आत्महत्या अथवा अन्य काही कारणामुळे झाला आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत.