दिल्ली पोलिसांच्या तपासात स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना त्याच्या मोबाईलमध्ये अनेक तरुणींशी अश्लील आणि आक्षेपाहार्य चॅट्स सापडले आहेत. यानंतर तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला असून, लवकरच पोलिस चैतन्यानंदच्या इन्स्टिट्यूटमध्ये पोहोचून संबंधित लोकांचे जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, इन्स्टिट्यूटमध्ये स्वामीसाठी खासकरून ऐशआरामासाठी आलिशान रूम तयार करण्यात आली होती. त्याने या ठिकाणाचा वापर वैयक्तिक विलासी जीवनासाठी केला होता का, याबाबतही चौकशी केली जात आहे. पोलिसांच्या तपासात असे संकेतही मिळाले आहेत की, तो दुबईतील एका शेखसाठी पार्टनर शोधण्याबद्दल बोलत होता. त्यामुळे मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता का, हा प्रश्न अधिक गंभीरपणे पुढे आला आहे.
चौकशीत उघड झालंय की चैतन्यानंद मुलींना फसवण्यासाठी भावनिक दबाव, प्रलोभने आणि विविध बहाण्यांचा वापर करत होता. त्याने अनेक युवतींसोबतचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये जतन केले होते. काही फोटोमध्ये एअरहोस्टेससह तरुणींचा समावेश असल्याचे आढळले.
दरम्यान, पोलिसांनी स्वामीच्या दोन महिला सहकाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्या चौकशीची दिशा चैतन्यानंदसोबत जोडली जात आहे. या महिलांकडूनही चौकशीत महत्त्वपूर्ण माहिती मिळू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र पोलिसांच्या चौकशीत बाबा सतत गोलमोल उत्तरे देत असून तपास दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्या तपास यंत्रणा या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, चैतन्यानंदच्या हालचालींचा थांगपत्ता लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. अश्लील चॅट्स, आलिशान रूम आणि संशयास्पद चर्चेमुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होत असून लवकरच आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.