Suryakumar Yadav Blessed With Baby Girl: भारतीय टी-20 संघाचा कर्णधार आणि 'मिस्टर 360 डिग्री' म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सूर्यकुमार यादव याच्या आयुष्यात एका नव्या सुखद अध्यायाची सुरुवात झाली आहे. सूर्यकुमार आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांना गुरुवारी कन्यारत्न प्राप्त झाले. पहिल्या अपत्याच्या आगमनामुळे यादव कुटुंबात आनंदाचे वातावरण असून सोशल मीडियावर या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मैदानावरील संघर्षात वैयक्तिक आयुष्यात आनंदाची बातमी
सूर्यकुमार यादवसाठी सध्या सुरू असलेला इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 चा हंगाम काहीसा आव्हानात्मक ठरत आहे. मैदानावर आपल्या फॉर्मसाठी त्याला संघर्ष करावा लागत असतानाच, मुलीच्या जन्माने त्याच्या वैयक्तिक आयुष्यात मोठा आनंद आणला आहे. ही बातमी समोर येताच क्रिकेट वर्तुळातील सहकारी आणि चाहत्यांनी या लाडक्या फलंदाजाला शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे.
2016 मध्ये झाला होता विवाह
सूर्यकुमार आणि देविशा यांचा विवाह 2016 मध्ये झाला होता. देविशा नेहमीच सूर्यकुमारच्या कारकिर्दीत त्याची खंबीर पाठिराखी राहिली आहे. भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक असलेल्या या जोडीच्या आयुष्यात आता एका चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर चाहत्यांनी ज्युनियर सूर्याचे स्वागत अशा आशयाचे संदेश लिहून आपले प्रेम व्यक्त केले आहे.