गुजरातमधील सुरत शहरात एका धक्कादायक दरोड्याची घटना समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या वराछा परिसरातील शाखेत सशस्त्र टोळीने धाड टाकत तब्बल 52 लाख रुपयांची रोकड लुटून नेली. या घटनेमुळे कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लांबे हनुमान परिसरात काल दुपारी (27 एप्रिल 2026) सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्या वेळी बँकेचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे त्या वेळी बँकेत कोणताही सुरक्षा रक्षक उपस्थित नव्हता. पाच दरोडेखोरांनी अचानक बँकेत प्रवेश करत पिस्तुलाचा धाक दाखवला आणि सहा कर्मचारी तसेच सहा ग्राहकांना एका कोपऱ्यात बसवून त्यांचे मोबाईल फोन जप्त केले.
52 लाखांची लूट
दरोडेखोरांनी नियोजनबद्ध पद्धतीने बँकेतील रोकड लुटली. एकूण 52 लाख रुपयांपैकी 40 लाख रुपये कॅश मॅनेजमेंट कंपनीचे होते, तर 12 लाख रुपये बँकेचे स्वतःचे होते. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व आरोपी स्पष्ट दिसत नसल्याने या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलिसांची तातडीने कारवाई
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त बलराम मीणा आणि करणराज वाघेला यांनी घटनास्थळी भेट देत तपासाची सूत्रे हाती घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली असून, ते मोटारसायकलवरून पळून गेल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी
प्राथमिक तपासात बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेतील मोठ्या त्रुटी समोर आल्या आहेत. बँकेत सुरक्षा रक्षक नव्हता, तसेच आपत्कालीन सायरनची वायर कापण्यात आली होती, त्यामुळे कोणतीही सूचना देता आली नाही. त्या वेळी बँकेत सहा कर्मचारी उपस्थित होते, ज्यामध्ये तीन कंत्राटी कर्मचारी होते.
पोलिसांच्या मते, पाच आरोपी बँकेत शिरले असले तरी इतर काही जण बाहेर लक्ष ठेवून होते. या टोळीने अत्यंत शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने सुमारे 50 मिनिटांत संपूर्ण दरोडा टाकला. काल दुपारी 1 ते 2 या वेळेत ही घटना घडली.
विशेष म्हणजे, बँकेबाहेर कॅश मॅनेजमेंट कंपनीची व्हॅन उभी होती आणि त्यामध्ये सशस्त्र सुरक्षा रक्षकही होता. मात्र, काही मीटर अंतरावर सुरू असलेल्या दरोड्याची त्याला कल्पनाही नव्हती. या घटनेमुळे बँक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.